Monday, 4 August 2025

महाराष्ट्रातील पर्यटनविषयक विविध महोत्सव, कार्यक्रम आणि उपक्रमांनाकार्यक्रमांसाठी प्रायोजकत्वाचे प्रस्ताव

 महाराष्ट्रातील पर्यटनविषयक विविध महोत्सव, कार्यक्रम आणि उपक्रमांनाकार्यक्रमांसाठी प्रायोजकत्वाचे प्रस्ताव

ऑनलाईन सादर करणे बंधनकारक

मुंबई दि. 28 : महाराष्ट्रातील पर्यटनविषयक विविध महोत्सव, कार्यक्रम आणि उपक्रमांना प्रायोजकत्व मिळवण्यासाठी महत्त्वाचा बदल जाहीर करण्यात आला आहे. यापुढे प्रायोजकत्वासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे सर्व प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या maharashtratourism.gov.in  या अधिकृत संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन पद्धतीने सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे, पर्यटन विभागाने प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

या संदर्भात, 30 एप्रिल, 2025 च्या शासन निर्णयानुसार हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत विविध शासकीय संस्था, सेवाभावी संस्था आणि खासगी संस्थांद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या पर्यटनविषयक कार्यक्रमांचे प्रायोजकत्वाचे प्रस्ताव थेट कार्यालयात सादर केले जात होते. नवीन कार्य पद्धतीनुसार, कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर पर्यटनविषयक प्रायोजकत्वाचे प्रस्ताव ऑनलाइन सादर करणे आवश्यक आहे.

यासाठी संदर्भाकरिता https://sponsorship.maharashtratourism.gov.in  ही थेट लिंक देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.  सर्व संबंधित शासकीय संस्था, सेवाभावी संस्था आणि खासगी संस्थांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि यापुढे प्रायोजकत्व निधी मागणीचे प्रस्ताव महाराष्ट्र पर्यटनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावेत. स्थानिक पातळीवरील संबंधितांनाही याबाबत माहिती देण्याची सूचना देण्यात आली आहे.

हा निर्णय पर्यटन विभागाच्या कामकाजात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. यामुळे प्रायोजकत्व प्रक्रिया अधिक वेगवान आणि कार्यक्षम होणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे निधी वितरणात एकसमानता आणि गतिमानता येईल, तसेच प्रशासकीय कामकाजात सुलभता येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

हर घर तिरंगा तिसरा टप्प्या 13 ऑगस्टपासून सुरू होणार www.harghartiranga.com

 तिसरा टप्प्या 13 ऑगस्टपासून सुरू होणार असून यात प्रत्येक घर, कार्यालय, वाहने यावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवा यासाठी ध्वजारोहणच्या सेल्फी काढून केंद्र शासनाच्या www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत आवाहन करण्याच्या सूचना सचिव डॉ.कुलकर्णी यांनी दिल्या.

हर घर तिरंगा 9 ऑगस्टपासून होत असून यात ‘तिरंगा महोत्सव’ राबविला जाईल. त्याचबरोबर तिरंगा मेळावा आणि तिरंगा कॉन्सर्ट कार्यक्रम pl share

 दुसऱ्या टप्प्याची सुरूवात 9 ऑगस्टपासून होत असून यात ‘तिरंगा महोत्सव’ राबविला जाईल. त्याचबरोबर तिरंगा मेळावा आणि तिरंगा कॉन्सर्ट कार्यक्रम हर घर तिरंगा राबविण्यात येणार आहेत, असे सांगून सचिव डॉ.कुलकर्णी म्हणाले की, तिरंगा मेळाव्याचे आयोजन राज्यात होणाऱ्या सरस महोत्सवासारखे करण्यात येणार आहे. यात तिरंगाचे प्रदर्शन आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्वांना सहज आणि सुलभरित्या तिरंगा उपलब्ध व्हावा, यासाठी महिला बचत गटाकडे तिरंगा निर्मिती व विक्रीचे काम देण्यात यावे. जिल्हा व गाव पातळीवर तिरंगा बाईक रॅली किंवा सायकल रॅलीचे आयोजन करण्यात यावे. त्याचबरोबर या कालावधीत प्रत्येकांच्या हातात तिरंगा देऊन तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात यावे. या मोहिमेत राज्यातील प्रत्येक विद्यार्थी, तरूण-तरूणी आणि नागरिक यांचा सहभाग वाढवून मनुष्यसाखळी तयार करावी तसेच मोठ्या प्रमाणावर देशभक्तीपर गीते आणि राष्ट्रगीते लावण्यात यावी, असेही डॉ.कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाची सुरूवात, पहिला टप्पा

 राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाची  सुरूवात

- सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुलकर्णी

मुंबई, दि. 1 : देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे, राज्यस्तरापासून गावपातळीपर्यंत तिरंगामय वातावरण व्हावे, या उद्देशाने 2 ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात यावे, अशा सूचना सांस्कृतिक कार्य सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी दिल्या.

केंद्र सरकारच्या सूचनेप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ अभियान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राबविला जाणार आहे. यासंदर्भात सचिव डॉ.कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपसचिव नंदा राऊत, उपसचिव महेश वाव्हळ, सांस्कृतिक कार्य संचालक विभिषण चवरे, राज्य मराठी विकास संस्थेच्या उपसंचालक अंजली ढमाळ तसेच दृरदृष्यसंवाद प्रणालीद्वारे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले तसेच विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

राज्यात मागील तीन वर्षापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीचे अभियान तीन टप्प्यात राबविण्यात येत असल्याचे सांगून सचिव डॉ.कुलकर्णी म्हणाले की, पहिला टप्पा 2 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविला जाईल. दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट 2025 तर तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून तिरंगामय वातावरण निर्मिती व्हावी, यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी दृश्य माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाची माहिती सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तिरंगा स्वयंसेवक यांची नोंदणी करून उत्कृष्ट काम केलेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देणे, शाळेच्या भिंतीवर तिरंगाचे चित्र काढणे, तिरंगाविषयक बाबींचे प्रदर्शन भरवणे, रांगोळी स्पर्धा आयोजित करणे, माय गर्व्हमेंट या संकेतस्थळावर प्रश्नमंजूषेत सहभागी होण्यासाठी जनतेला आवाहन करणे, तिरंगा राखी तयार करण्याची स्पर्धा आयोजित करणे असे विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून पत्रलेखन करून ते जवान, पोलीसांना पोस्टल सेवेद्वारे पाठविणे. स्वत:चे घर, आजुबाजूचा परिसर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणे, तिरंगाची रोषणाई आणि लाईटिंग करणे असे विविध उपक्रम 2 ते 8 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याचे सचिव डॉ.कुलकर्णी यांनी सांगितले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करणार

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित

चित्रपट प्रदर्शित करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणे, दि.१: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, त्यांचे महान कार्य, अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल, याकरीता निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासित करुन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दाखविलेल्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेल, अशी ग्वाही  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंड क्रमांक ५, ६ आणि ७ च्या साहित्य प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्य मंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमित गोरखे, विजय शिवातारे, सुनील कांबळे, हेमंत रासणे,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणु गोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून क्रांती घडवली, समाजाला तेज, स्फुलिंग दिले. साहित्यातील एक एक व्यक्तीरेखा जिवंत केल्या. यांच्या लिखाणामध्ये करुणा, संवेदना, क्रांती, काव्य आणि एक वैश्विकता पहायला मिळते. त्यांचे साहित्य जगातील २२ भाषेत अनुवादित झाले असून त्या-त्या देशात ते प्रसिद्ध आहे. तसेच देशातील विविध विद्यापीठात त्यांच्या साहित्यांवर संशोधन सुरू आहे.  रशियामध्ये त्यांच्याबद्दल असलेला सन्मान, आत्मीयता, त्यांच्या साहित्यावर होणारा अभ्यास बघता अभिमानाने ऊर भरुन येतो, भारत मातेच्या या सुपुत्राचे साहित्य खऱ्याअर्थांने वैश्विक झाले आहे.

 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, सिनेमा पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास दर्शन आदी साहित्यातील प्रत्येक अंगात बहारदारपणा आणला आहे. त्यांनी ४९ वर्षाच्या आयुष्यात ४० पेक्षा अधिक कादंबऱ्या आणि विविध प्रकारच्या रचना लिहिल्या आहेत. त्यांच्या साहित्यावर आज हजारो लोक पीएचडी करीत आहेत. खऱ्या अर्थाने ते एक चालते बोलते विद्यापीठ होते, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

 

 संताच्या मांदियाळींनी समाजाच्या विषमतेवर प्रहार करतांना समाजामध्ये सुधारणा करुन एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी त्याच भावनेने तत्कालीन समाज व्यवस्थेची मांडणी करतांना आंर्तभावना, वेदना, संवेदना दर्शवितांना कुठेही कटुता आणली नाही. त्यांचे समाजाला एकत्रित करणारे साहित्य आहे. संपूर्ण समतायुक्त समाज निर्माण करण्याचे कार्य केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्या पोवाडा, गीतांनी  तरुणाईला स्फूर्ती देण्याचे काम केले.

 

रशियात असतांना वीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतून आलेलो आहे, याठिकाणी वीरांना वदंन करण्याकरिता आलेलो आहे, असे त्यांनी सांगितले. नैराश्य हे तलवारीवर साचलेले धुळीसारखे असते, धुळ झटकली की तलवार पुन्हा धारधार होते, पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगाराच्या तळहातावर उभी आहे, असे प्रेरक विचार त्यांनी दिले.

 

अण्णा भाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनातून त्यांचे व्यक्तीमत्व मोठे झाले. त्यांच्या  लेखणीतून समाजाला दिशा, प्रेरणा, सामान्य माणसाला बळ, वंचिताचा आवाज देण्याचे कार्य केले. त्यांचे हे कार्य समाजासमोर आणण्याचे काम सुरू आहे. समाजाची मूलतत्त्वे सांगणारे, संवेदना जीवंत ठेवणारे अजरामर साहित्य पुढच्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, यादृष्टीने संशोधन झाले पाहिजे. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाकरिता २५ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे, स्मारकाचे आराखडेही तयार झाले आहेत. येत्याकाळात लवकरात लवकर स्मारक पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

कालमर्यादेत निश्चित करून जागतिक पातळीवरचे संस्कृत विद्यापीठ उभारु

 कालमर्यादेत निश्चित करून जागतिक पातळीवरचे संस्कृत विद्यापीठ उभारु

-  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

▪ परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुल व

 शैक्षणिक भवनचे लोकार्पण

नागपूर, दि.१ :  जगातील अनेक जुन्या संस्कृती कालागणिक व्यपगत झाल्या, नामशेष झाल्या परंतु भारतीय संस्कृतीला सनातन स्वरुपात टिकवून राहता आले. भारतीय संस्कृतीला टिकवून ठेवण्याचे मोलाचे कार्य संस्कृत भाषेच्या माध्यमातून शक्य झाले. स्थापत्य, आयुर्वेद, खगोल, गणित, रसायन आदी ज्ञानशाखेतील ज्ञानभंडार संस्कृत भाषेमध्ये असून त्याला समाजापुढे नेण्यासाठी कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुल व शैक्षणिक भवनचे लोकार्पण व विद्यार्थी भवनचे भूमिपूजन वारंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जायस्वाल, कुलगुरु हरेराम त्रिपाठी, संस्थापक कुलगुरू डॉ. पंकज चांदे उपस्थित होते.

संस्कृत भाषेचे विद्यापीठ साकारण्यासाठी डॉ. श्रीकांत जिचकार व माजी संस्थापक कुलगुरु डॉ. पंकज चांदे यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला. कविकुलगुरु कालिदास यांच्या नावाने हे विद्यापीठ असल्याने ते रामटेक येथे व्हावे अशी सुरुवातीला संकल्पना होती. तथापि संस्कृत भाषेच्या या ज्ञानपिठाला वैश्विक स्तरावर पोहचणे सुलभ व्हावे यासाठी आपण रामटेक तालुक्यातील व नागपूर पासून जवळ असलेल्या शैक्षणिक संकुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारंगा येथे हे संपूर्ण ज्ञानसंकुल विकसित करण्याचा निर्णय घेतला. येथे शेजारीच असलेल्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर येत्या काळात निश्चित कालमर्यादेत जागतिक पातळीवरचे संस्कृत विद्यापीठ उभारु, असे त्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय संस्कृती, भारतीय जीवनमूल्य, भारतीय जीवनपद्धती याला अधोरेखित करुन यातील जीवनमूल्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी डॉ. हेडगेवार यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. संस्कृत ज्ञान भाषेतील हे मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. ती आपली ज्ञानभाषा आहे. 102 अब्ज 78 कोटी 50 लक्ष एवढी शब्दसंख्या संस्कृतमध्ये आहे. जगातील समृद्ध भाषा म्हणून संस्कृतकडे पाहिले जाते. या विद्यापिठाच्या माध्यमातून आपण संस्कृतला अधिक समृद्ध करु, या असे त्यांनी सांगितले.

संस्कृत भाषा मला शिकण्याची इच्छा आहे. माझी आई संस्कृतमध्ये एम. ए. असून भविष्यात या विद्यापिठाच्या सेवेत माझी समिदा मी निश्चित देईल, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, कोकण विभागातील 2,738 रूग्णांना 25 कोटी 86 लाखांची मदत

 मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, कोकण विभागातील

2,738 रूग्णांना 25 कोटी 86 लाखांची मदत

 

मुंबई, दि. 31 : राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः कोकण विभागात मागील सात महिन्यामध्ये 2,738 रूग्णांना तब्बल 25 कोटी 86 लाख 37 हजार रूपयांची मदत दिली गेली आहे.   

             मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार पेपरलेस आणि डिजिटल प्रणाली तसेच जिल्हा कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. ज्यामुळे रुग्णांना मंत्रालयात येण्याची गरज भासत नाही. रुग्णांनी प्रथम महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, किंवा धर्मादाय रुग्णालयांच्या योजनांचा लाभ घ्यावा. जर या योजनांद्वारे उपचार शक्य नसतील, तर, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाकडे संलग्न असणाऱ्या रुग्णालयातून अर्ज करता येतो. यामुळे शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होतो आणि निधीचा उपयोग खऱ्या गरजू रुग्णांपर्यंत पोहोचत असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

Featured post

Lakshvedhi