मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बालस्नेही पुरस्कार
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने ‘बालस्नेही पुरस्कार – २०२४’ प्रदान करण्याचा सोहळा ३ मार्च २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. राज्यात बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी अनेक प्रशासकीय यंत्रणा, संस्था आणि अधिकारी विपरीत परिस्थितीतही मोलाचे कार्य करत आहेत. त्यांच्या या भरीव योगदानाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोगाने राज्यस्तरीय ‘बालस्नेही’ पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या पुरस्काराच्या माध्यमातून बालहक्क संरक्षण व बालविकास क्षेत्रात योगदान देणाऱ्या सर्व प्रशासकीय यंत्रणा, अधिकारी-कर्मचारी आणि संस्थांना नवचैतन्य आणि ऊर्जा मिळेल. तसेच, बालकल्याणासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, हे मत आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह यांनी व्यक्त केले.
सदर पुरस्कार हे विभागनिहाय देण्यात येणार आहेत, त्याचे विवरण खालील प्रमाणे -
महसूल विभाग: ६ महसूली विभागांमधून प्रत्येकी १ जिल्हाधिकारी व १ मुख्य कार्यकारी अधिकारी – एकूण १२ अधिकारी
पोलीस विभाग: जिल्हा पोलीस अधीक्षक व अन्य अधिकारी-कर्मचारी – एकूण ३० अधिकारी व कर्मचारी
शालेय शिक्षण विभाग: प्रत्येक महसूली विभागातून १ शाळा, अशा ६ शाळांचा गौरव
महिला व बालविकास विभाग: एकूण ९८ अधिकारी व कर्मचारी, तसेच संस्था यांचा यावेळी सन्मान करण्यात येणार आहे.
०००