भवताल’...
सुरुवातीला दिवाळी अंकासाठी हे नाव दिलं गेलं. त्यानंतर मासिकासाठी आणि पुढं एकूणच निसर्ग-पर्यावरणाविषयक मंचासाठी दिलेलं हे नाव. हे नाव ऐकताच अनेकांची प्रतिक्रिया असते की, या विषयासाठी इतकं समर्पक नाव दुसरं असूच शकत नाही! अगदी खरंय ते.
पण हे नाव कुठून आणि कसं आलं? हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. त्याचीच ही गोष्ट.
या नावाची सुरुवात होते- ‘लोकसत्ता’ या वर्तमानपत्रापासून. मी १९९६ सालापासून ‘लोकसत्ता’ शी संबंधित होतो. त्या वर्षी अगदी अपघाताने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा, पत्रकारितेच्या वर्गाला प्रवेश घेतला. लगेचच काही महिन्यांनी, गणपतीच्या काळात विद्यार्थी म्हणून ‘लोकसत्ता’ मध्ये प्रवेश केला. पुढे २०१५ पर्यंत तिथेच होतो. त्या वर्षी दिवाळीत ‘भवताल’ या नावाने नियतकालिक सुरू केले. त्याच्या थोडासा आधी ‘लोकसत्ता’ तून बाहेर पडलो. तब्बल १९ वर्षांचा हा काळ, विद्यार्थी ते वरिष्ठ सहसंपादक अशी प्रगती होत गेली.
या काळात बरंच काही केलं. त्यापैकी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवामान, पर्यावरण या विषयांसाठी दिलेलं योगदान. हवामान, भूविज्ञान, पाणी या विषयांवर केलेले स्तंभलेखन. लहरी हवा, दगडांच्या देशा, पाणी ते पाणी... या स्तंभामधील लेखांची आठवण अजूनही काही वाचक करून देतात. महाराष्ट्रातील नद्यांच्या पात्रात फिरून त्यांची सद्यस्थिती मांडणारी, ‘मरणासन्न नद्या’ ही दीर्घ वृत्तमालिका लिहली. तिचंही तेच. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून मराठी पत्रकारितेत पूर्वी काठावर असलेले हे विषय केंद्रस्थानी येण्यास मदत झालीच. शिवाय व्यक्तिश: मला पत्रकारितेतील प्रतिष्ठेचा ‘रामनाथ गोएंका अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन जरनॅलिझम’ याच्यासह इतर पुरस्कारही मिळाले. पाच पुस्तके झाली. या सर्वांमध्ये आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ‘लोकसत्ता’ मध्ये सलग पाच-सहा वर्षे चालवलेले पर्यावरणासाठीचे पान. त्या वेळी म्हणजे २००५ – ०६ च्या सुमारास पर्यावरणासाठी असे साप्ताहिक / पाक्षिक पान चालवणे ही कल्पना नवी होती.
या पानाच्या निमित्ताने ‘भवताल’ चा जन्म झाला. त्या वेळी श्री. कुमार केतकर हे ‘लोकसत्ता’ चे संपादक होते. त्यांनी दिलेली संधी आणि प्रोत्साहन यामुळे हे विषय हाताळू शकलो. या पर्यावरणाच्या पानाची संकल्पना मांडल्यावर, त्याचे नाव काय असावे, यावर बरीच चर्चा झाली. याबाबत मुंबईत त्या वेळच्या संपादकीय विभागातील वरिष्ठांची चर्चा झाली. अनेक शब्द सुचवण्यात आले. तत्कालीन सहसंपादक रेखा देशपांडे यांनी नाव सुचवले, ‘ताल – भवताल.’ त्यावरील चर्चेत ‘ताल’ शब्द मागे पडला आणि ‘भवताल’ या नावाने पान सुरू झाले. या पानाशी माझी ओळख निर्माण झाली. पुढे २०११-१२ च्या सुमारास हे पान बंद झाले, तरी ती अभिजित घोरपडे या नावाशी भवताल ची असलेली ओळख टिकून होती.
पुढच्या काळात म्हणजे २०१५ या वर्षात मी ‘लोकसत्ता’ तून बाहेर पडलो. आपण ज्या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणात लिहीत आलो आहोत, ज्यावर काम करत आलो आहोत, त्या विषयांसाठी म्हणून स्वतंत्रपणे काहीतरी सुरू करावे, असे कितीतरी वर्षे आधी मनात घोळत होते. त्यातून या विषयांना वाहिलेले मासिक किंवा नियतकालिक सुरू करावे, त्याचा आगळा-वेगळा दिवाळी अंक असावा असा विचार पुढे आला. त्याला स्वाभाविकपणे ‘भवताल’ हे नाव दिले. असा या नावाचा जन्म. पुढे ‘भवताल’ ची व्याप्ती वाढत गेली. त्याच्या अंतर्गत मासिकाच्या पलीकडे अनेक उपक्रम सुरू झाले. पुढेही अनेक गोष्टी येतील. त्याची सुरुवात मात्र दिवाळी अंक आणि नियतकालिकापासून झाली.
- अभिजित घोरपडे
संस्थापक - संपादक, भवताल
(‘भवताल’ ची जडणघडण आणि प्रवासाबाबत वाचकांना माहिती देण्यासाठी हा उपक्रम...)
( क्रमश: )
--
भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com
Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com