Friday, 4 August 2023

कीटक खाणारी, अडीच मार्कांची वनस्पती !

 


कीटक खाणारी, अडीच मार्कांची वनस्पती !




कीटक खाणाऱ्या वनस्पतीबद्दल प्रचंड कुतूहल होतं. अगदी लहानपणीपासून. जीवशास्त्राच्या पुस्तकात त्यांचे फोटो पाहून प्रचंड आश्चर्य वाटायचं. दवबिंदू आणि घटपर्णी... हे दोन शब्द मनात स्पष्टपणे कोरले गेलेत. पण आतापर्यंत त्यांचा संबंध आला तो, परीक्षेत फक्त अडीच मार्कांसाठी आकृती काढण्यापुरता. खाली एक पेल्याच्या आकार, वरती झाकण आणि त्यात काही किडे दाखवायचे. झाकणाला अर्धा मार्क असायचा 😊 आकृत्या काढताना आम्हा विद्यार्थ्यांची प्रतिभा खुलायची. मग घटपर्णीचा कधी भोपळा व्हायचा, तर कधी रांजण!




लहाणपणी या आकर्षणातून अनेक कल्पना सुचायच्या. मनात किंवा आपापसात कथा, गूढकथा निर्माण व्हायच्या. पुढे काही सिनेमांमधून माणसाला गिळणाऱ्या कल्पनेतल्या वनस्पती पाहायला मिळाल्या, पण या दोघी काही भेटल्या नाहीत. दवबिंदू अर्थात ड्रॉसेराची आपल्याकडच्या सड्यांवर (Lateritic plateau) पवसाळ्यात गाठ पडली. अतिशय सुंदर आणि आकर्षक. पण ती भिंगामधून पाहिल्याशिवाय नीट दिसणार नाही इतकी छोटीशी. आपल्याकडे तशा इतर कीटकभक्षी वनस्पतीही आहेत. त्याही अगदी छोट्या. कोणाची मुळं कीटक खाण्याचे काम करतात, तर कोणाच्या जमिनीलगत असलेलं खोडावर ही व्यवस्था. त्या स्पष्ट, थेट दिसत नसल्याने समाधान व्हायचे नाही.




ही झाली पार्श्वभूमी. खरी गोष्ट आता सुरू होतेय. “भवताल” च्या ‘Exploring Monsoon @Cherrapunjee’ या इकोटूरच्या निमित्ताने अलीकडेच चेरापुंजी, मौसमाई, शिलाँग, मॉलिनाँग, दावकी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाणे झाले. स्वच्छ गाव म्हणून नावाजलेल्या मॉलिनाँग येथे सकाळी गावाचा फेरफटका मारत होतो. त्यावेळी नाल्याच्या कडेला अचानक काहीतरी दिसलं आणि थांबलो. पाहतो तर ती घटपर्णी! एक न्याहाळायला लागलो, तर आजूबाजूला पाहावं तिकडं तीच. कुठं कुंपणावर चढलेली, तर कुठं अडगळीत वाढलेली... एखादं तण वाढावं अगदी तशी! कधीकधी लाजाळू बाबतही असं घडतं. एखादं रोप पाहून अप्रूप वाटतं, मग रस्त्याच्या कडेला सगळीकडं तीच पाहायला मिळते.




खरं तर आपल्याकडचा जास्त पावसाचा भाग आणि त्याहून जास्त पावसाचा ईशान्य भारत यामध्ये वनस्पतींच्या दृष्टीने बरेचसे साधर्म्य पाहायला मिळाले. दोन्हीकडे उष्णप्रदेशीय हवामान. पण मग घटपर्णी आपल्याकडं का नाही? वनस्पतीवैज्ञानिक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीच्या वनस्पतीविज्ञान विभागातील प्राध्यापक डॉ. मिलिंद सरदेसाई यांनी त्याचे श्रेय तिथल्या पावसाबरोबरच आर्द्रतेला दिले. या घटपर्णीचा घट मोठा होऊन त्याचे झाकण वेगळे होण्याआधी म्हणजे घट मिटलेला असताना, ती औषधी म्हणून वापरली जाते. घट वाढून झाकण उघडल्यावर त्यात कीटक जायला लागतात आणि तो मग त्यात आम्लं पाझरायला लागतात.




ईशान्य भारतातल्या, विशेषत: मेघालयाच्या सफरीत बऱ्याच गोष्टी भेटल्या, पाहिल्या, ऐकल्या. त्यातली ही कीडे खाणारी, अडीच मार्कांची घटपर्णी वेगळी विशेष!





@ अभिजित घोरपडे


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi