*बोईसरमध्ये ३ नोव्हेंबरपासून राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा*
ठाणे प्रतिनिधी: राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना आपले क्रीडाकौशल्य सिद्ध करण्याची संधी देणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धांचा थरार बोईसरमध्ये रंगणार आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने ३ ते ५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत बोईसर येथील TAPS ३ व ४ मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ क्रीडा विभागांमधून सुमारे ७०० खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यामुळे बोईसरमध्ये राज्यभरातील खेळाडूंचा उत्साह, कौशल्य आणि क्रीडास्पर्धेचा रंग अनुभवायला मिळणार आहे.
स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंच्या निवास व भोजनाची व्यवस्था बोईसर येथील डॉन बॉस्को विद्यालयात करण्यात आली आहे. खेळाडूंना स्पर्धेच्या कालावधीत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आली आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमुळे पालघर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला राज्यस्तरीय व्यासपीठ मिळणार असून, स्थानिक क्रीडाप्रेमींनाही दर्जेदार मैदानी स्पर्धा अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.