महाराष्ट्रात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे
मुंबई, दि. २२:- राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम–२०१३ अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सार्वजनिक वितरण व्यवस्था, शालेय पोषण आहार योजना व राष्ट्रीय एकात्मिक बाल विकास सेवा योजना या तिन्ही महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावी व समाधानकारक असल्याचे मत हिमाचल प्रदेशच्या राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष एस. पी. कत्याल यांनी व्यक्त केले.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित आढावा बैठकीस अध्यक्ष कत्याल उपस्थित होते. बैठकीत राज्य अन्न आयोग मुंबईचे सह सचिव तथा सदस्य सचिव आत्राम, सचिव प. फ. गांगवे यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील पुरवठा, शिक्षण तसेच महिला व बाल विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष कत्याल यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अन्नधान्य, पोषण आहार व बालकल्याण सेवांची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विविध विभागांकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेत विभागनिहाय सूचना केल्या