तानसेन दरबारात गात होता .. गाणे रंगत चालले .. संथ आलाप संपून तेजाळ काजव्यांसारखे ,वणव्यात वाऱ्याने उडणाऱ्या ठिणग्यांसारखे भेदक सूर लय तालांतून गिरक्या घेऊ लागले ... तसतसे दिल्लीच्या हिवाळ्यातले ते थंड वातावरण उबदार होऊ लागले ... अनेकांनी लपेटलेल्या आपापल्या उंची शाली सैल केल्या .. विचित्र काहीतरी घडत होते ... गायनाची तीव्रता वाढत होती तसतशी कणाकणाने उष्णता वाढत होती ... एकीकडे मनाला संमोहित करून पकडून ठेवणारे सूर तर दुसरीकडे या उष्णतेने बैचैन होणारे शरीर या घालमेलीतून सगळेजण जात असतानाच .. गायनाचा परमोच्च बिंदू आला ... जवळ कुठेतरी आगीचा लोळ उसळला आहे असे वाटले आणि अचानक महालातले तेल वात घालून ठेवलेले सगळे दिवे पेटले.. तानसेनाच्या बाजूचा किनखापी पडदा देखील पेटून धडधडा जळू लागला.. तानसेन गाणे थांबवून गलितगात्र होऊन बाजूच्या गिरदीवर कलंडला... बादशाहासहित सगळे दरबारी अवाक होऊन एक दोन क्षण पाहतच राहिले आणि नंतर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट..."दीपक राग"
तानसेनाला अनेक बक्षीस मिळाली ... चारी दिशांना कीर्ती पोहोचली... पण या गोष्टीचा आनंद एक व्यक्ती उपभोगू शकत नव्हती आणि ती म्हणजे स्वतः तानसेन ... दीपक राग गायिल्यामुळे तानसेनाच्या अंगात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती ..खरंतर ऐरागैरा दीपक रागाने भस्मच होऊन जायचा पण गुरु हरिदासांच्या कृपेने जीवावरचं निभावल पण अंगाची लाहीलाही काही थांबत नव्हती .. आणि हलाहल विष पिऊन कंठात विष राहिलेल्या महादेवाप्रमाणे तानसेनच्या कंठात त्या उष्णतेचा परिणाम होऊन सूर निघणेच कठीण झाले ... तानसेन मनातून कोसळला
तानसेनचे गाणे थांबले... बादशाहासहित सगळे हळहळले .. यावर उपाय काय .. अनेक वैद्य हकीम झाले ..जादू मंतर झाले . मग कुणीतरी सांगितले.. अग्नीला तोड म्हणजे पाणी .. याच्या तोलामोलाच्या कुणी गायकाने मल्हार राग ऐकवला तर कदाचित याचे दुःख दूर होईल.. .. आता तानसेनाच्या तोलामोलाचा गायक सापडणार कुठे ... सगळ्या साम्राज्यात शोध सुरु झाला ..अनेक दिवस गेले आणि एक दिवस बातमी आली .. गुजरातमध्ये वडनगर गावात दोन जुळ्या मुली राहतात .दिव्य निर्मल सुरांत गातात .. त्यांचे नाव "ताना" आणि "रीरी".
तानसेन वडनगरला पोहोचला.. ताना-रीरीच्या घरी .. त्यांच्या घरच्यांना विनंती केली .. पण आम्ही घरंदाज आम्ही कोणासमोर गाणार नाही असा त्यांचा ठाम निश्चय .. समोर सापडलेली सुरगंगा पण अजूनही दुर्लभ ... अनेकदा विनंती केल्यावर शेवटी दोघी बहिणी गावातील देवीच्या मंदिरासमोर पडद्याआड राहून देवीसाठी गाणार आणि तानसेन पडद्याच्या पलीकडून ऐकणार असे ठरले ..
तो दिवस उगवला .. ताना रीरी देवीसमोर मल्हार गाऊ लागल्या .. पहिला सूर कानी पडताच तानसेनाच्या कानात अमृताचे थेंबच पडले ... डोळ्यातून अश्रू वाहू लागले .. हा स्वर्गीय सूर ..आणि हे सुरांचे पावित्र्य .. वातावरण बदलू लागले .. कुंद झाले ... ढग भरून येऊ लागले .. आणि काही वेळाने आवेगाने बरसू लागले ... तानसेन पावसात आणि मल्हारच्या सुरांत मनसोक्त भिजू लागला ... अहंकार ढेकळासारखा फुटून वितळून गेला .. .. दीपक रागाने पेटलेला वणवा मल्हारच्या वर्षावाने विझला .. अंतर्बाह्य थंडावा ...
इकडे दिल्लीला खबर पोहोचली .. तानसेनपेक्षा चार पाऊले पुढे असणाऱ्या दोन कन्या ..दोन गायिका .. आपल्या दरबारात कशा नाहीत ... बादशहाने विनन्तीचा निरोप पाठवला .. पण "आम्ही फक्त अंबा मैया समोर गाणार दरबारात गाऊ शकत नाही" म्हणून ताना रिरिने उत्तर पाठवले ... असं कसं चालेल?.. या अकबराच्या दरबारात सगळी रत्ने पाहिजेतच .. मग बादशहाने दरखास्त सोडून हुकूम पाठवला ... तरीदेखील पुन्हा नकार ... आता बादशाहाने कैफात येऊन सैनिक पाठवले , ताना रीरीला काहीही करून घेऊन या आणि नाही आल्या तर गाव उध्वस्त करा ...
ताना रीरी धर्मसंकटात सापडल्या .. जावे तर मर्यादेचा भंग ..न जावे तर सगळे गाव हकनाक बळी जाणार .. शेवटी त्यांनी तो मधला मार्ग काढला ... रात्री सगळे गाव आणि घरातले लोक झोपेत असताना .. घरासमोरच्या खोल काळ्याकभिन्न विहिरीला त्यांनी आपलंसं केलं ..
बादशाह अपराधी भावाने अहंकाराच्या आणि लोभाच्या कैफातुन भानावर आला .. ताना रीरीचे स्मारक वड नगरला बांधण्यात आले .. तानसेन दुःखाने उन्मळून पडला .. आपल्या काही संगीतरचनांमधून त्याने ताना रीरीच्या स्मृतीला स्थान दिले ...
आज देखील गुजरात सरकारतर्फे ताना रिरीच्या स्मरणार्थ ताना रीरी संगीत महोत्सव आयोजित केला जातो आणि त्यांच्या नावाने संगीत क्षेत्रातील दोन लोकांना सोबत पुरस्कार दिला जातो.
गुजराती भाषेतील लोकगीते आजही ताना रीरीची गोष्ट सांगतात .. आणि वडनगरच्या वाऱ्यात पाऊस पडत असताना मल्हारचे फिकट सूर ऐकू येतात...