साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित
चित्रपट प्रदर्शित करणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि.१: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, त्यांचे महान कार्य, अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल, याकरीता निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासित करुन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दाखविलेल्या मार्गावर राज्य शासन मार्गक्रमण करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यखंड क्रमांक ५, ६ आणि ७ च्या साहित्य प्रकाशन समारंभात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्य मंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमित गोरखे, विजय शिवातारे, सुनील कांबळे, हेमंत रासणे,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणु गोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून क्रांती घडवली, समाजाला तेज, स्फुलिंग दिले. साहित्यातील एक एक व्यक्तीरेखा जिवंत केल्या. यांच्या लिखाणामध्ये करुणा, संवेदना, क्रांती, काव्य आणि एक वैश्विकता पहायला मिळते. त्यांचे साहित्य जगातील २२ भाषेत अनुवादित झाले असून त्या-त्या देशात ते प्रसिद्ध आहे. तसेच देशातील विविध विद्यापीठात त्यांच्या साहित्यांवर संशोधन सुरू आहे. रशियामध्ये त्यांच्याबद्दल असलेला सन्मान, आत्मीयता, त्यांच्या साहित्यावर होणारा अभ्यास बघता अभिमानाने ऊर भरुन येतो, भारत मातेच्या या सुपुत्राचे साहित्य खऱ्याअर्थांने वैश्विक झाले आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, सिनेमा पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास दर्शन आदी साहित्यातील प्रत्येक अंगात बहारदारपणा आणला आहे. त्यांनी ४९ वर्षाच्या आयुष्यात ४० पेक्षा अधिक कादंबऱ्या आणि विविध प्रकारच्या रचना लिहिल्या आहेत. त्यांच्या साहित्यावर आज हजारो लोक पीएचडी करीत आहेत. खऱ्या अर्थाने ते एक चालते बोलते विद्यापीठ होते, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.
संताच्या मांदियाळींनी समाजाच्या विषमतेवर प्रहार करतांना समाजामध्ये सुधारणा करुन एकत्रित करण्याचा प्रयत्न केला, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी त्याच भावनेने तत्कालीन समाज व्यवस्थेची मांडणी करतांना आंर्तभावना, वेदना, संवेदना दर्शवितांना कुठेही कटुता आणली नाही. त्यांचे समाजाला एकत्रित करणारे साहित्य आहे. संपूर्ण समतायुक्त समाज निर्माण करण्याचे कार्य केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्या पोवाडा, गीतांनी तरुणाईला स्फूर्ती देण्याचे काम केले.
रशियात असतांना वीर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीतून आलेलो आहे, याठिकाणी वीरांना वदंन करण्याकरिता आलेलो आहे, असे त्यांनी सांगितले. नैराश्य हे तलवारीवर साचलेले धुळीसारखे असते, धुळ झटकली की तलवार पुन्हा धारधार होते, पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नाही तर कामगाराच्या तळहातावर उभी आहे, असे प्रेरक विचार त्यांनी दिले.
अण्णा भाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनातून त्यांचे व्यक्तीमत्व मोठे झाले. त्यांच्या लेखणीतून समाजाला दिशा, प्रेरणा, सामान्य माणसाला बळ, वंचिताचा आवाज देण्याचे कार्य केले. त्यांचे हे कार्य समाजासमोर आणण्याचे काम सुरू आहे. समाजाची मूलतत्त्वे सांगणारे, संवेदना जीवंत ठेवणारे अजरामर साहित्य पुढच्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे, यादृष्टीने संशोधन झाले पाहिजे. साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाकरिता २५ कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आले आहे, स्मारकाचे आराखडेही तयार झाले आहेत. येत्याकाळात लवकरात लवकर स्मारक पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment