कालमर्यादेत निश्चित करून जागतिक पातळीवरचे संस्कृत विद्यापीठ उभारु
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
▪ परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुल व
शैक्षणिक भवनचे लोकार्पण
नागपूर, दि.१ : जगातील अनेक जुन्या संस्कृती कालागणिक व्यपगत झाल्या, नामशेष झाल्या परंतु भारतीय संस्कृतीला सनातन स्वरुपात टिकवून राहता आले. भारतीय संस्कृतीला टिकवून ठेवण्याचे मोलाचे कार्य संस्कृत भाषेच्या माध्यमातून शक्य झाले. स्थापत्य, आयुर्वेद, खगोल, गणित, रसायन आदी ज्ञानशाखेतील ज्ञानभंडार संस्कृत भाषेमध्ये असून त्याला समाजापुढे नेण्यासाठी कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुल व शैक्षणिक भवनचे लोकार्पण व विद्यार्थी भवनचे भूमिपूजन वारंगा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जायस्वाल, कुलगुरु हरेराम त्रिपाठी, संस्थापक कुलगुरू डॉ. पंकज चांदे उपस्थित होते.
संस्कृत भाषेचे विद्यापीठ साकारण्यासाठी डॉ. श्रीकांत जिचकार व माजी संस्थापक कुलगुरु डॉ. पंकज चांदे यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला. कविकुलगुरु कालिदास यांच्या नावाने हे विद्यापीठ असल्याने ते रामटेक येथे व्हावे अशी सुरुवातीला संकल्पना होती. तथापि संस्कृत भाषेच्या या ज्ञानपिठाला वैश्विक स्तरावर पोहचणे सुलभ व्हावे यासाठी आपण रामटेक तालुक्यातील व नागपूर पासून जवळ असलेल्या शैक्षणिक संकुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारंगा येथे हे संपूर्ण ज्ञानसंकुल विकसित करण्याचा निर्णय घेतला. येथे शेजारीच असलेल्या नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीच्या धर्तीवर येत्या काळात निश्चित कालमर्यादेत जागतिक पातळीवरचे संस्कृत विद्यापीठ उभारु, असे त्यांनी यावेळी सांगितले.
भारतीय संस्कृती, भारतीय जीवनमूल्य, भारतीय जीवनपद्धती याला अधोरेखित करुन यातील जीवनमूल्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी डॉ. हेडगेवार यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. संस्कृत ज्ञान भाषेतील हे मूल्य नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे. ती आपली ज्ञानभाषा आहे. 102 अब्ज 78 कोटी 50 लक्ष एवढी शब्दसंख्या संस्कृतमध्ये आहे. जगातील समृद्ध भाषा म्हणून संस्कृतकडे पाहिले जाते. या विद्यापिठाच्या माध्यमातून आपण संस्कृतला अधिक समृद्ध करु, या असे त्यांनी सांगितले.
संस्कृत भाषा मला शिकण्याची इच्छा आहे. माझी आई संस्कृतमध्ये एम. ए. असून भविष्यात या विद्यापिठाच्या सेवेत माझी समिदा मी निश्चित देईल, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment