जिल्हास्तरीय 'नशा मुक्त भारत अभियान' स्पर्धा संपन्न
मुंबई, दि. 1 : माय भारत, मुंबई, राष्ट्रीय सेवा योजना आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या एम. एल. दहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त), विलेपार्ले (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नशा मुक्त भारत अभियान स्पर्धांचे आयोजन 31 जुलै रोजी करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे अध्यक्ष सीए अनिल गानू यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी संस्थेचे मानद सचिव दिलीप पेठे, माय भारत, मुंबईचे उपसंचालक अनुप इंगोले, पीटीव्हीए इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालक डॉ. तेजश्री देशमुख, विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक चैत्राली साबळे तसेच एम. एल. दहाणूकर कॉलेज ऑफ कॉमर्स (स्वायत्त)चे प्राचार्य प्रा. डॉ. विनय भोळे उपस्थित होते.
उपसंचालक अनुप इंगोले यांनी नशा मुक्त भारत अभियान आणि स्पर्धांच्या उद्देशाविषयी माहिती दिली. प्राचार्य प्रा. डॉ. विनय भोळे यांनी युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. पोलीस निरीक्षक चैत्राली साबळे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीविषयी मार्गदर्शन केले.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील 20 महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी समूह नृत्य, पथनाट्य, चित्रकला, घोषवाक्य लेखन, रील निर्मिती, संगीत, काव्यवाचन आणि वक्तृत्व या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. सर्व स्पर्धांचा विषय नशा मुक्त भारत अभियान हा होता. प्रत्येक स्पर्धेसाठी तीन परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.
स्पर्धांमध्ये 250 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वैयक्तिक स्पर्धांतील विजेत्यांना क्रमांक प्रमाणपत्रे, तर सांघिक स्पर्धांतील विजेत्यांना क्रीडा साहित्य संच आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी शुद्धोधन आठवले, श्रुती सावे, कल्पेश वरणकर, पीटीव्हीए इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे जिगर पटेल, माय भारत, मुंबईचे अनुप इंगोले तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी समन्वय साधला