Saturday, 23 November 2024

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक उपलब्ध करुन देण्यात येणार

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दिव्यांग उमेदवारांना मार्गदर्शक सूचना

मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी लेखनिक उपलब्ध करुन देण्यात येणार

 

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्यावेळी दिव्यांग व्यक्तींना भरपाई वेळ व दिव्यांग उमेदवार हे लिहिण्यासाठी सक्षम नसल्यास त्यांच्या मागणीप्रमाणे परीक्षेच्यावेळी त्यांना लेखनिक उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने आयोगाच्या संकेतस्थळावर 'दिव्यांग उमेदवारांकरीता मार्गदर्शक सूचना' प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केल्यानंतर संबंधित दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मदत घेण्याची आणि/अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असल्यास आयोगाकडे संबंधित सर्व कागदपत्रांसह संदर्भीय शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार विनंती अर्ज सादर करुन पूर्व परवानगी घेणे अनिवार्य आहे.

आयोगामार्फत प्रसिध्द करण्यात आलेल्या अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा गट-क  च्या जाहिरातीस अनुसरुन अर्ज सादर केलेल्या व लेखनिकाची मदत घेण्याची अथवा भरपाई वेळेची आवश्यकता असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी विहित नमुन्यातील विनंती अर्ज, संबंधित सर्व कागदपत्रे तसेच प्रमाणपत्रे हे पडताळणी, अनुवाद चाचणीच्या वेळी सोबत मूळ प्रतींसह सादर करणे अनिवार्य राहील.

लेखनिकाची मागणी करणाऱ्या दिव्यांग उमेदवारांने या संदर्भात शासन परिपत्रकातील परिच्छेद क्र. ६ मधील "लेखनिक/ वाचक / प्रयोगशाळा सहाय्यक यांची शैक्षणिक पात्रता या परीक्षेकरिता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असावी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा एका टप्प्याने कमी असावी" या तरतुदीकडे विशेषत्वाने लक्ष वेधण्यात येत आहे. या परीक्षांकरिता किमान शैक्षणिक अर्हता, विविध विषयातील पदवी असल्याने लेखनिकाची कमाल शैक्षणिक अर्हता पदवीच्या एक टप्पा कमी म्हणजे १२ वी असणे आवश्यक आहे. या शासन परिपत्रकातील तरतुदीनुसार दिव्यांग उमेदवाराने लेखनिकाची मागणी करणे आवश्यक आहे.

लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळ आवश्यक असलेल्या उमेदवारांनी प्रमाणपत्रे पडताळणी/अनुवाद चाचणीच्या वेळी प्रपत्र १/प्रपत्र २, लक्षणीय दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व नमुना क्रमांक ११ अशी कागदपत्रे सादर करावीत.

शारीरिक दिव्यांगत्व (दोन्ही हात बाधित/नसलेले) / मेंदुचा पक्षाघात असलेल्या उमेदवारांनी नमुना क्रमांक ११ सादर करणे आवश्यक नाही.

 

लेखनिकाची मागणी करणा-या दिव्यांग उमेदवारांनी प्रपत्र १/ प्रपत्र २ मध्ये स्वतःची शैक्षणिक अर्हतादेखील नमूद करणे आवश्यक आहे.

विहित प्रपत्र १/ प्रपत्र २ व नमुना क्रमांक ११ आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ/


 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर

 

मुंबई, दि. २२ :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या विविध संवर्गांच्या पदांच्या मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दिनांक २७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२४ या कालावधीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबई येथील सीबीडी बेलापूर कार्यालयात या मुलाखती घेण्यात येतील.

तालुका क्रीडा अधिकारी

तालुका क्रीडा अधिकारी संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या चाळणी छाननीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक ५ व ६ डिसेंबर, २०२४ रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब

इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीअंती मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २८ नोव्हेंबर, २०२४ तसेच दिनांक ३ व ४ डिसेंबर, २०२४ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

प्राध्यापक क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (गट-अ)

विविध संवर्गाच्या पदभरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलेल्या छाननीअंती,चाळणीअंती मुलाखतीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक २७ व २८ नोव्हेंबर, २०२४ या कालावधीत आयोगाच्या सीबीडी बेलापूर, नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत

प्राध्यापक, क्षयरोगशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात येतील.

सहयोगी प्राध्यापक, शल्यचिकित्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ,ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर, २०२४, सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (धाराशिव)ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर, २०२४,

सहयोगी प्राध्यापक, नेत्रशल्यचिकीत्साशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (नंदुरबार)ची मुलाखत दि. २७ नोव्हेंबर, २०२४

सहयोगी प्राध्यापक, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ (परभणी)ची मुलाखत दि.२७ नोव्हेंबर, २०२४

सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ ची मुलाखत दि.२७ व २८ नोव्हेंबर, २०२४

सहयोगी प्राध्यापक, शरीरक्रियाशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, परभणी गट- अ ची मुलाखत दि.२७ व २८ नोव्हेंबर, २०२४

राध्यापक, विकृतीशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ सिंधुदुर्ग ची मुलाखत दि.२८ नोव्हेंबर, २०२४ रोजी घेण्यात येतील.

००००

वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग- गट-अ मधील संवर्गाचा निकाल जाहीर

 वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग- गट-अ मधील संवर्गाचा निकाल जाहीर

 

मुंबई, दि. २२ :- वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, गट-अ मधील सह्योगी प्राध्यापक संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आले आहे. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सहयोगी प्राध्यापक, जीवरसायनशास्त्र (Biochemistry), शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, गट-अ;

सहयोगी प्राध्यापक, न्यायवैद्यकशास्त्र (Forensic Medicine), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ, सातारा;

            सहयोगी प्राध्यापक, अस्थिव्यंगोपचारशास्त्र (Orthopedics), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ.आणि

सहयोगी प्राध्यापक, शरिररचनाशास्त्र (Anatomy), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गट-अ, परभणी. या संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले

उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) - गट ब - (अराजपत्रित) पदाचा निकाल जाहीर मुंबई, दि. २२ : उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) गट- ब (अराजपत्रित) या संवर्गाच्या मुलाखती दिनांक २७ सप्टेंबर, १६ व १७ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदाचा निकाल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

 उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) - गट ब - (अराजपत्रित) पदाचा निकाल जाहीर

 

मुंबई, दि. २२ : उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी) गट- ब (अराजपत्रित) या संवर्गाच्या मुलाखती दिनांक २७ सप्टेंबर, १६ व १७ ऑक्टोबर २०२४ रोजी घेण्यात आल्या होत्या. या पदाचा निकाल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

००००

विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का; करवीर मतदारसंघात सर्वाधिक मतदान

 विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का;

करवीर मतदारसंघात सर्वाधिक मतदान

 

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आदर्श आचारसंहिता लागू होऊन २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदान झाले. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात मागील सुमारे 30 वर्षामध्ये या वर्षी सर्वांधिक 66.05 टक्के मतदान झाले. मागील पाच वर्षाच्या तुलनेत राज्याच्या मतदान टक्केवारीत सुमारे 5 टक्के वाढ झाली आहे. या वाढत्या मतदान टक्केवारीस राज्यातील मतदार हा नक्कीच अभिनंदनास पात्र ठरला आहे.

यावर्षीच्या निवडणुकीत मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता मतदार यादीतील नोंदीत महिलांमध्ये करवीर, चिमूर, ब्रम्हपूरी, नेवासा, कागल, आरमोरी, नवापूर, शाहूवाडी, कुडाळ तसेच पळुस-कडेगाव या मतदारसंघांत महिलांचा सहभाग सर्वांधिक दिसून येतो.

महाराष्ट्र राज्याच्या 288 मतदारसंघाकरिता राज्यात एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. यात 5 कोटी 22 हजार 739 पुरूष मतदार, 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदार तर 6 हजार 101 इतर मतदार म्हणून नोंदीत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या  निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान केलेले 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदार आहेत. यात प्रत्यक्ष मतदानात 3 कोटी 34 लाख  37 हजार 57 पुरूष, 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिला तर 1 हजार 820 इतर मतदारांनी सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजावला.

288 मतदारसंघाचा मतदानाचा ताळेबंद पाहता, यावर्षी सर्वांधित मतदान हे करवीर मतदारसंघात म्हणजे 84.96 टक्के मतदान झाले तर सर्वांधिक कमी मतदान हे कुलाबा या मतदारसंघात झाले. कुलाबा या मतदारसंघात 44.44 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

000

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज

·         मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई

·         ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रनिहाय प्रत्येकी १४ टेबल

·         टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठीही एकूण ३६ टेबल

मुंबई दि. २२  :- मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी दहा वेगवेगळ्या मतमोजणी केंद्रांवर होणार आहे. मतमोजणीसाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

मतदान केंद्रांवरील आवश्यक त्या सोयीसुविधा व उपाययोजनांबाबत मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, संबंधित विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी हे पाहणी करुन सातत्याने आढावा घेत आहेत.

मतमोजणी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मा. भारत निवडणूक आयोगाने मतमोजणी निरीक्षक म्हणून धारावी विधानसभा मतदारसंघासाठी सत्यप्रकाश टी.एल. (भा.प्र.से.), सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघासाठी केदार नाईक, वडाळा विधानसभा मतदारसंघासाठी विक्रम सिंह मलिक, माहिम विधानसभा मतदारसंघासाठी हिमांशु गुप्ता, वरळी विधानसभा मतदारसंघासाठी समीर वर्मा, शिवडी विधानसभा मतदारसंघासाठी के. सी. सुरेंदर, भायखळा विधानसभा मतदारसंघासाठी अंजना एम., मलबार हिल विधानसभा मतदारसंघासाठी रवींद्र नाथ गुप्ता, मुंबादेवी विधानसभा मतदारसंघासाठी शिल्पा शिंदे,  कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी मोहम्मद रेहान रझा ‌यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

मतदान यंत्रातील (ईव्हीएम) मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर  स्वतंत्र मतमोजणी कक्ष तयार करण्यात आले असून प्रत्येक कक्षामध्ये १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. प्रत्येक टेबलवर एक  सूक्ष्म निरीक्षक, एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई असे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच टपाली मतमोजणीसाठी वडाळा, माहिम आणि वरळी विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०५ टेबल, भायखळा आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०४, धारावी, शिवडी आणि मलबार हिल  विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी ०३ टेबल तर सायन कोळीवाडा आणि मुंबादेवी मतदारसंघासाठी प्रत्येकी ०२ असे एकूण ३६ टेबल असतील. सेवा मतदारांच्या पुर्वमतमोजणीसाठी जिल्ह्यातील १०  विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी एक असे एकूण १० टेबल असतील. सकाळी ०८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष टपाली मतमोजणीला सुरुवात होईल. त्यानंतर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समक्ष संबंधित विधानसभा क्षेत्रातील मतदान यंत्रावरील मतमोजणीला सुरुवात होईल.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी फेऱ्या

धारावी विधानसभा मतदारसंघ – १९ मतमोजणी फेऱ्या,  सायन-कोळीवाडा – २०, वडाळा -१६, माहीम – १८, वरळी – १७, शिवडी – १९, भायखळा – १९, मलबार हिल – २०, मुंबादेवी – १७, कुलाबा – १९ अशा मतमोजणी फेऱ्या होणार आहेत. 

सैनिक मतदारांच्या मतपत्रिका छाननीसाठी स्थापित ईटीपीबीएमएस कक्ष, एनकोअर प्रणालीवर माहिती भरण्यासाठी स्थापित कक्ष, सर्व मतमोजणी कक्षातील फेरीनिहाय, उमेदवारनिहाय आकडेवारीची सारणी तयार करण्यासाठी स्थापित टॅब्युलेशन कक्ष आदी विविध कक्षात अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीनंतर ईव्हीएम आणि सांविधानिक व असांविधानिक लिफाफे सील करण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय वेगवेगळी पथके गठित करण्यात आली आहेत.

प्रत्येक टेबलवर उमेदवारांनी नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींना त्या टेबलवर कोणकोणत्या मतदान केंद्रावरील मतमोजणी होणार आहे, याबाबत माहिती देणारे फलक मतमोजणी कक्षात लावण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्र परिसरात प्रवेश करताना पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाणार असून अधिकृत पास असल्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्रवेशद्वारापासूनच मतमोजणी प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून मतमोजणी कक्षातील प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे.

मतमोजणी केंद्राच्या ३०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू

जिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने  मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या संदर्भात गुंतलेला अधिकारी किंवा अशा मतमोजणी केंद्रावर किंवा त्यांच्या परिसरात कर्तव्यात गुंतलेल्या कोणत्याही लोकसेवकाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने मतमोजणी केंद्रापासून अथवा मतमोजणी केंद्राच्या परिसरापासून ३०० मीटर त्रिज्येच्या अंतरात, महामार्ग रस्ता, गल्लीबोळ किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरणे किंवा कोणत्याही लोकांच्या सभा किंवा गट तयार करण्यास व सामील होण्यास मनाई असेल, असे आदेश पोलीस प्रशासनाने निर्गमित केले आहेत.

मतमोजणी केंद्र परिसरात स्वतंत्र मीडिया सेंटर तयार करण्यात आले असून भारत निवडणूक आयोगाकडून प्राधिकारपत्र (पासेस) दिलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना याठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. प्रसार माध्यम प्रतिनिधींना सुध्दा केवळ मीडिया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल मीडिया सेंटर येथे जमा करावा लागेल.

मतदार संघ व मतमोजणी केंद्र

धारावी - भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, तळमजला, किचन रूम, धारावी बस आगाराच्या जवळ, सायन वांद्रे लिंक रोड, धारावी, मुंबई - ४०००१७.

सायन कोळीवाडा - न्यू सायन मुन्सिपल स्कूल, प्लॉट नंबर 160/ 161, स्कीम सहा, रोड नंबर 28, लायन ताराचंद बाप्पा हॉस्पिटल जवळ, सायन पश्चिम, मुंबई-४०००२२.

वडाळा - बीएमसी नवीन इमारत, सीएस नंबर ३५५ बी, स्वामी वाल्मिकी चौक, हनुमान मंदिरासमोर, विद्यालंकार मार्ग, अँटॉप हिल, मुंबई-३७

माहीम - डॉक्टर अँटनिओ डी'साल्व्हिया हायस्कूल, एमरोल्ड हॉल, दादर, मुंबई-28.

 वरळी - पश्चिम रेल्वे जिमखाना हॉल, सेनापती बापट मार्ग, महालक्ष्मी क्रीडा मैदान

शिवडी - ना. म. जोशी मार्ग, बीएमसी प्राथमिक शाळा क्रमांक दोन, लोअर परळ, मोनो रेल स्टेशन जवळ, ना.म. जोशी मार्ग, करी रोड, मुंबई-११.

भायखळा - रिचर्डसन अँड क्रूडास लिमिटेड, तळमजला हॉल, जे जे रोड, ह्युम हायस्कूल जवळ, भायखळा, मुंबई-०८

मलबार हिल - विल्सन कॉलेज, तळमजला, रूम नंबर १०२, १०४, नेताजी सुभाष चंद्र मार्ग, गिरगाव चौपाटी, चर्नी रोड, मुंबई-०७.

मुंबादेवी - तळमजला, गिल्डर लेन, बीएमसी शाळा, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन समोर, मुंबई सेंट्रल पूर्व, मुंबई-०८.

कुलाबा - न्यू अप्लाइड आर्ट असेंबली हॉल (एक्झिबिशन हॉल), जे जे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट्स, डॉ. डी. एन. रोड, फोर्ट, मुंबई -

*****

शैलजा पाटील/विसंअ/

 

 


Friday, 22 November 2024

विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का; करवीर मतदारसंघात सर्वाधिक मतदान

 विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदात्यांचा वाढता टक्का;

करवीर मतदारसंघात सर्वाधिक मतदान

 

मुंबई, दि. २२ : महाराष्ट्रात १५ ऑक्टोबर २०२४ रोजी आदर्श आचारसंहिता लागू होऊन २० नोव्हेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता मतदान झाले. या निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रात मागील सुमारे 30 वर्षामध्ये या वर्षी सर्वांधिक 66.05 टक्के मतदान झाले. मागील पाच वर्षाच्या तुलनेत राज्याच्या मतदान टक्केवारीत सुमारे 5 टक्के वाढ झाली आहे. या वाढत्या मतदान टक्केवारीस राज्यातील मतदार हा नक्कीच अभिनंदनास पात्र ठरला आहे.

यावर्षीच्या निवडणुकीत मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहता मतदार यादीतील नोंदीत महिलांमध्ये करवीर, चिमूर, ब्रम्हपूरी, नेवासा, कागल, आरमोरी, नवापूर, शाहूवाडी, कुडाळ तसेच पळुस-कडेगाव या मतदारसंघांत महिलांचा सहभाग सर्वांधिक दिसून येतो.

महाराष्ट्र राज्याच्या 288 मतदारसंघाकरिता राज्यात एकूण 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार आहेत. यात 5 कोटी 22 हजार 739 पुरूष मतदार, 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 महिला मतदार तर 6 हजार 101 इतर मतदार म्हणून नोंदीत आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या  निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान केलेले 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदार आहेत. यात प्रत्यक्ष मतदानात 3 कोटी 34 लाख  37 हजार 57 पुरूष, 3 कोटी 6 लाख 49 हजार 318 महिला तर 1 हजार 820 इतर मतदारांनी सहभाग नोंदवून आपला मतदानाचा हक्क बजावला.

288 मतदारसंघाचा मतदानाचा ताळेबंद पाहता, यावर्षी सर्वांधित मतदान हे करवीर मतदारसंघात म्हणजे 84.96 टक्के मतदान झाले तर सर्वांधिक कमी मतदान हे कुलाबा या मतदारसंघात झाले. कुलाबा या मतदारसंघात 44.44 टक्के मतदान झाल्याची नोंद आहे.

Featured post

Lakshvedhi