एशियाटिक सोसायटीचे कार्य अधिक व्यापक व्हावे
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एशियाटिक सोसायटीच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी राज्य शासनाचे पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली. इतिहास हा केवळ भूतकाळ समजून घेण्याचे साधन नसून वर्तमानाला दिशा देणारा आणि भविष्याचा वेग निश्चित करणारा महत्त्वपूर्ण दुवा आहे, असे त्यांनी सांगितले. मानवतेचा प्रवास, विचारांची जडणघडण, अभ्यासपद्धती आणि विविध शास्त्रांची उत्क्रांती यांचे दस्तऐवजीकरण होणे अत्यावश्यक आहे. परकीय आक्रमणांमध्ये नालंदा विद्यापीठाच्या मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेल्या ग्रंथसंपदेच्या घटनांतून ज्ञानसंपदेच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित होते. मात्र अनेक विद्वानांनी उपलब्ध ग्रंथांचे संरक्षण करून ही समृद्ध ज्ञानपरंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवली. या परंपरेचे जतन आणि संवर्धन करणे ही आजची मोठी जबाबदारी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
नव्या कार्यकारिणीच्या प्रयत्नांमुळे संस्थेला नवसंजीवनी मिळाली असून एशियाटिक सोसायटी नव्या उमेदीने कार्यरत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सोसायटीच्या ग्रंथालय विभागाच्या मुख्य कार्यालयासाठी नवीन जागा तयार झाली आहे. या ठिकाणी मुख्य कार्यालय लवकरच सुरू करण्यासाठी शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल. सोसायटीच्या मुख्य कार्याला अधिक बळ मिळावे, तसेच येथे येणाऱ्या अभ्यासकांना आवश्यक ग्रंथ, संदर्भसाहित्य आणि ज्ञानसंपदा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल. मुख्यमंत्री कार्यालय, संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून आवश्यक मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी एशियाटिक सोसायटीच्या नूतन कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत संस्थेच्या भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या