महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद;
महाराष्ट्रातून ४३२ अर्ज सादर
मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२६' साठी महाराष्ट्रभरातून ४३२ मंडळांनी अर्ज सादर केले आहेत. यात ठाणे जिल्ह्याचे सर्वाधिक ५२ अर्ज प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेचा विस्तार मागील वर्षीपासून तालुकास्तरापर्यंत करण्यात आला होता.
यावर्षीपासून प्रथमच ही स्पर्धा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विस्तारित करण्यात आली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २५ सप्टेंबर आहे. अर्ज सादर करताना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मंडळांनी गेल्या वर्षभरातील आयोजित केलेल्या गणेशोत्सव व संबंधित सांस्कृतिक उपक्रमांची तसेच यावर्षीच्या गणेशोत्सवाची छायाचित्रे जिओ टॅग फोटोसहीत सादर करावयाची आहेत. आतापर्यंत राष्ट्रीय स्तरासाठी देशभरातील विविध शहरांतून अर्ज प्राप्त झाले आहेत. तर आंतरराष्ट्रीय स्तरासाठी जपान, श्रीलंका, जर्मनी, नायजेरिया, सिंगापूर इ. देशांतून अर्ज प्राप्त झाले असून, या स्पर्धेचा जागतिक विस्तार या राज्य महोत्सवाला 'ग्लोबल' ओळख मिळवून देताना दिसतो आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाचे पारंपरिक व सांस्कृतिक महत्त्व ओळखून शासनाकडून गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' म्हणू घोषित करण्यात आले आहे. मागील वर्षी या स्पर्धा व संबंधित अन्य उपक्रम यांच्या आयोजनात व्यापक बदल करण्यात आले असून वर्षागणिक मंडळांचा व नोंदणीकृत संस्थांचा या स्पर्धेतील सहभाग वाढत आहे.
स्पर्धेचे परीक्षण अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येते. सहभागी मंडळांना तालुकास्तरावरील व जिल्हास्तरावरील परीक्षण समिती प्रत्यक्ष भेट देणार असून, भेटीदरम्यान सहभागी मंडळांची सर्व कागदपत्रे, वर्षभरात राबविलेले उपक्रम, त्यांचे अहवाल, फोटो व व्हिडिओ तसेच सांस्कृतिक स्पर्धा, संस्कृती व सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन विषयक उपक्रम, भाविकांसाठी केलेल्या सोयी सुविधा, विविध स्पर्धा, विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिक यांसाठीचे कायमस्वरूपी व उत्सव काळातील उपक्रम, पर्यावरण पूरक मूर्ती व सजावट, प्रदूषणरहित वातावरण इ. विविध बाबींच्या आधारे परीक्षण करण्यात येणार आहे. हे परीक्षण ऑनलाईन स्वरूपातील असल्याने परीक्षकांना जिओ टॅग फोटो द्वारे आपला निकाल सादर करावयाचा आहे. यामुळे निकालात पारदर्शकता निर्माण होऊन स्पर्धेचे नियमन व नियंत्रण अधिक प्रभावीपणे करता येते.
तालुकास्तरीय प्रथम विजेत्याला २५ हजार, जिल्हास्तरीय विजेत्यांना अनुक्रमे ५० हजार ४० हजार व ३० हजार रकमेची पारितोषिके देण्यात येणार असून व राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रथम तीन विजेत्यांना ७.५ लाख, ५ लाख, २.५ लाखांची पारितोषिकांची घोषणा करण्यात आली आहे.
तसेच घरगुती व सार्वजनिक गणपतीचे दर्शन घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सर्वांना होण्यासाठी तयार करण्यात आलेले https://ganeshotsav.pldmka.co.
या राज्य महोत्सवातील सर्व उपक्रमांमध्ये मंडळांनी व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment