महाडीबीटीवर २९ नवीन योजनांसह आता १०५ योजना;
उर्वरित सर्व योजना टप्प्याटप्प्याने आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न
महाडीबीटीमुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढल्याचे
देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
मुंबई, दि. १५ : राज्यातील नागरिकांना विविध वैयक्तिक योजनांचा लाभ अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने मिळावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आज नव्याने २९ योजनांचे लोकार्पण (ऑनबोर्डिंग) करण्यात आले. त्यामुळे महाडीबीटीवर उपलब्ध योजनांची संख्या आता १०५ झाली आहे. शासनाच्या उर्वरित सर्व योजनाही टप्प्याटप्प्याने या एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न असून, त्याद्वारे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. महाडीबीटीची व्यवस्था सुरू झाल्यापासून शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढले असून, योजनांचा गैरवापर लक्षणीयरीत्या कमी झाला आहे, असे त्यांनी नमूद केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने २९ नवीन योजनांच्या लोकार्पण (ऑनबोर्डिंग) कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या प्रसंगी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री ॲड. आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, माहिती तंत्रज्ञान आयुक्त श्रीमती भुवनेश्वरी पी. तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी प्रमुख उपस्थित होते.
पात्र लाभार्थ्यांपर्यंत थेट आणि योग्य पद्धतीने लाभ पोहोचविण्यासाठी डिजिटल प्रणाली अधिक सक्षम करण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. शासनाच्या ‘सेकंड जनरेशन रिफॉर्म्स’ अंतर्गत महाडीबीटी व्यवस्था अधिक सक्षम, कार्यक्षम आणि विश्वासार्ह करण्याचे काम सुरू आहे. विविध विभागांच्या योजनांचे टप्प्याटप्प्याने ऑनबोर्डिंग करण्यात येत असून, भविष्यात शासनाच्या सर्व प्रमुख योजना या एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये किंवा पोर्टलवर जाण्याची आवश्यकता कमी होऊन सेवा वितरण अधिक सुलभ होईल, असेही त्यांनी सांगितले.
आज ऑनबोर्ड करण्यात आलेल्या २९ योजनांमध्ये इतर मागासवर्गीय विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या योजनांचा समावेश आहे. या योजनांचे महाडीबीटीवर यशस्वीपणे ऑनबोर्डिंग केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित दोन्ही विभागांचे अभिनंदन केले. शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ नागरिकांना घरबसल्या अथवा जवळच्या सेवा केंद्रातून कमीत कमी अडचणींसह मिळावा, यासाठी भविष्यातही नागरिककेंद्री डिजिटल सुधारणांना अधिक वेग देण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले, माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत सातत्याने सुधारणा करण्यात येत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सेवा वितरण अधिक गतिमान, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्यात येत आहे.