Saturday, 15 August 2026

बीड येथे 80 वा स्वातंत्र्यदिन सोहळा संपन्न सदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड घडवण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी

 वृत्त क्र. 3087

बीड येथे 80 वा स्वातंत्र्यदिन सोहळा संपन्न

सदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड

घडवण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी

                                    - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

 

बीड, दि. 15 :-  सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड घडविण्याचा शासनाचा संकल्प आहे. यासाठी सर्व बीडकरांनी साथ द्यावी, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्वातंत्र्य दिन संदेशात केले.

 बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी दिव्यांक गुप्ता आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार विजयसिंह पंडित, नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांचीही विशेष उपस्थिती होती.

 उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणल्या की, बीड जिल्हा आता विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करत आहे.  भारत सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रांपैकी एक म्हणून अभिमानाने उभा आहे. शेतीपासून अंतराळापर्यंत, शिक्षणापासून तंत्रज्ञानापर्यंत आणि उद्योगापासून डिजिटल क्रांतीपर्यंत देशाने मोठी झेप घेतली आहे.

 देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणारे स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाचे स्मरण करत उपमुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान देणाऱ्या सर्व मुक्तीसैनिकांच्या कार्याप्रती  कृतज्ञता व्यक्त केली.

 जिल्ह्याच्या विकासाचा कणा असलेल्या बळीराजाच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बीड जिल्ह्यातील हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 711 कोटी रुपये जमा करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात आला आहे. पुढील टप्प्यात आणखी शेतकऱ्यांचे सातबारे कोरे होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने तातडीने ॲग्री स्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले. 

बीड जिल्ह्यात 2025-26 मध्ये अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने 1 हजार 459 कोटींचं अनुदान मंजूर केले आहे. आतापर्यंत 9 लाख 22 हजार 362 बाधित शेतकऱ्यांना 634 कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान राज्यात जलसंधारण सप्ताह राबविला जाणार आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्याला अधिक समृद्ध, हरित आणि जलसमृध्द बनवण्याचा संकल्प करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी यावर्षी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 623 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून जिल्ह्याच्या गरजेनुसार प्राधान्यानं विकासकामं करण्यात येणार आहेत असे श्रीमती पवार यांनी यावेळी सांगितले.

ऊसतोड कामगारांच्या आरोग्यासाठी मिशन साथीराबवले जात आहे. आयुष्मान भारत आणि महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड देण्यात आले आहे.  ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बीड शहरात उभारण्यात आलेले संत भगवानबाबा मुलांचे शासकीय वसतिगृहहे महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीचे पहिले वसतिगृह आहे, असे श्रीमती पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या की, बीड-पुणे रेल्वे प्रकल्प हा जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत ही रेल्वे पुण्यातील हडपसरपर्यंत नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सोबतच टाटा टेक्नॉलॉजीज आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेले 196 कोटी रुपयांचे कौशल्य संवर्धन केंद्र पूर्णत्वास येत आहे. परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 301 कोटी रुपयांच्या सुधारित विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या विकास प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑलिम्पिक पदकविजेते स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा यंदा बीड जिल्ह्यात होणार आहे. बीडच्या क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी दिली.

बीडला प्रत्येक क्षेत्रात नव्या उंचीवर नेऊन समृद्ध, सक्षम आणि सुरक्षित बीड घडवण्याचा संकल्प आहे. पाटोदा तालुक्यातील जरेवाडी जिल्हा परिषद शाळा ही गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उत्तम उदाहरण आहे. याच धर्तीवर बीडमधील शैक्षणिक प्रवाह अधिक गतिमान करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत प्रत्येकाशी वैयक्तिक संवाद साधला. सोबतच नागरिकांना भेटून त्यांनाही शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री सहायता कक्ष व मुख्यमंत्री धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष यांच्या तर्फे आयोजित रक्तदान शिबीराचे त्यांनी यावेळी उद्घाटन केले. जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा रूग्णालयातर्फे हे शिबीर घेण्यात आले.

0000


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi