विकास सर्वसमावेशक असावा; शेवटच्या घटकापर्यंत
विकासाची फळे पोहोचविणे आवश्यक
- राज्यपाल जिष्णु देव वर्मा
मुंबई, दि. २३ : विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, विशेषतः दुर्गम आणि आदिवासी भागांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. विकास हा सर्वसमावेशक असावा. पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि विकासाच्या योजनांची फळे २०४७ पर्यंत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
लोकभवन मुंबई येथे मागील ७५ वर्षांत विविध देशांचे राष्ट्रप्रमुख, शासनप्रमुख आणि आंतरराष्ट्रीय मान्यवर यांनी दिलेल्या भेटींच्या दुर्मिळ छायाचित्रांचे ‘संस्थात्मक वारसा’ हे प्रदर्शन मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्यांनी प्रेस क्लबच्या कार्यकारिणी सदस्यांशी संवाद साधला. प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण आणि चेअरमन एस. बालाकृष्णन यांनी राज्यपालांचे स्वागत केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे प्रेस क्लबचे कोषाध्यक्ष ओमप्रकाश तिवारी, जनरल सेक्रेटरी अनिल सिंग तसेच कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.
त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामांचा अनुभव सांगताना राज्यपाल म्हणाले की, ग्रामीण विकास आणि आदिवासी भागांचा विकास हा आपल्या कार्यकाळातील महत्वाचा प्राधान्यक्रम होता. ग्रामीण विकास विभागाला नोडल विभाग म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आकांक्षित ब्लॉक घोषित करणाऱ्या देशातील पहिल्या राज्यांमध्ये त्रिपुराचा समावेश होता. २०१९ मध्ये राज्यातील १२ ब्लॉक आकांक्षित ब्लॉक म्हणून घोषित करण्यात आले. विकासाच्या विविध निर्देशांकांमध्ये मागे असलेल्या आदिवासी भागांना विकासाच्या एका विशिष्ट स्तरावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. हे तत्कालीन सरकारचे महत्वपूर्ण यश असल्याचे त्यांनी नमूद केले.
No comments:
Post a Comment