लोकभवनातील ऐतिहासिक छायाचित्रांचे प्रदर्शन
संस्थात्मक वारसा या प्रदर्शनासाठी एकूण ३४ ऐतिहासिक छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये युगोस्लाव्हियाचे नेते मार्शल टिटो यांच्या सन्मानार्थ राजभवन येथे आयोजित स्वागत समारंभ (१९५४), इथियोपियाचे सम्राट हॅले सिलासी यांच्या सन्मानार्थ तत्कालीन काळजीवाहू राज्यपाल एम. सी. छागला यांनी आयोजित केलेले स्नेहभोजन (१९५६), चीनचे तत्कालीन पंतप्रधान चाऊ एनलाय यांच्या सन्मानार्थ आयोजित स्नेहभोजन (१९५६) यांचा समावेश आहे.
तसेच अफगाणिस्तानचे राजे मोहम्मद झहीर शाह आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची राजभवन येथे झालेली भेट (१९५८), घानाचे पंतप्रधान डॉ. क्वामे एनक्रुमाह आणि राज्यपाल श्रीप्रकाश यांची भेट (१९५८), इराकचे अध्यक्ष अब्दुल सलाम आरिफ यांचे राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित आणि उपराष्ट्रपती झाकीर हुसेन यांनी राजभवन येथे केलेले स्वागत (१९६४), झेकोस्लोव्हाकियाचे पंतप्रधान ल्युबोमीर स्त्रौगल यांचे राज्यपाल आलियावर जंग यांनी केलेले स्वागत (१९७९), शिया इस्माइली समाजाचे धर्मगुरू प्रिन्स करीम आगा खान यांच्या विविध भेटींची छायाचित्रे प्रदर्शनात आहेत.
पूर्व जर्मनीचे अध्यक्ष एरिक होनेकर यांचे राज्यपाल सादिक अली आणि मुख्यमंत्री शरद पवार यांनी केलेले स्वागत (१९७९), पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह झालेली भेट, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि राज्यपाल अलेक्झांडर यांची भेट, तसेच राज्यपाल एस. एम. कृष्णा आणि जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्या भेटींच्या छायाचित्रांचाही समावेश आहे. याशिवाय अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक भेटींचे दुर्मिळ छायाचित्र या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत.
हे छायाचित्र प्रदर्शन २३ नोव्हेंबरपासून एक आठवडा सर्वांसाठी खुले राहणार आहे. त्यानंतर प्रदर्शनातील छायाचित्रे महाराष्ट्र लोकभवन येथे जतन करून ठेवण्यात येणार आहेत.
00000
No comments:
Post a Comment