Tuesday, 17 November 2026

शैक्षणिक वर्ष २०२७ मध्ये २१ सीईटी परीक्षा; ११ अभ्यासक्रमांसाठी दोन संधी,पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम नर्सिंगची प्रथमच सीईटी पीसीएमची पहिली परीक्षा १६ ते २६ एप्रिलदरम्यान

 शैक्षणिक वर्ष २०२७ मध्ये २१ सीईटी परीक्षा;

११ अभ्यासक्रमांसाठी दोन संधी

-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

  • पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम नर्सिंगची प्रथमच सीईटी
  • पीसीएमची पहिली परीक्षा १६ ते २६ एप्रिलदरम्यान

 

            मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा एकूण २१ सीईटी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यापैकी ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

 

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा  पाटील म्हणाले, यंदापासून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (पीजीडीएम), पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (पीजीसीएम) आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (जीएनएम) या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रथमच घेतल्या जाणार आहेत. जानेवारी महिन्यात परीक्षा सुरू होऊन १० जून २०२७ पर्यंत विविध सीईटी परीक्षा पार पडणार आहेत.

 

            २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या २० सीईटी परीक्षांसाठी १८ लाख १४ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर १६ लाख ३१ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने यंदा दोन वेळा सीईटी घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची संख्या तीनवरून ११ करण्यात आली आहे.

 

११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा

            राष्ट्रीय स्तरावर जेईई मेनच्या दोन परीक्षा घेतल्या जात असल्याने विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळतात. याच धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही दोन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मागील वर्षापासून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए/एमएमएस या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी दोन वेळा घेण्यात येत आहेत.

 

            या प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा आणखी आठ अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार पीसीएम, पीसीबी, एमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम, पाच वर्षीय एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम अशा एकूण ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी घेतली जाणार आहे.

 

            विद्यार्थ्यांना पहिली सीईटी देणे बंधनकारक असून दुसरी सीईटी ऐच्छिक राहणार आहे. दोन्ही परीक्षा दिल्यास प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या ज्या परीक्षेत अधिक पर्सेंटाइल गुण असतील, तेच गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

 

पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएमची प्रथमच सीईटी

            शासनाच्या निर्देशानुसार यंदा पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम नर्सिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रथमच सीईटी घेण्यात येणार आहे. यामध्ये पीजीडीएम आणि पीजीसीएम या अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा होणार आहेत. पीजीडीएम व पीजीसीएम यांची सीईटी एमबीए सीईटी बरोबरच घेतली जाणार आहे.

 

 

 

दोन सीईटीच्या संभाव्य तारखा

 

एमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम : पहिली परीक्षा २८ ते ३० जानेवारी २०२७; दुसरी परीक्षा १ ते ३ एप्रिल २०२७.

पाच वर्षीय एलएलबी : पहिली परीक्षा २८ ते २९ मार्च; दुसरी परीक्षा २४ मे २०२७.

पीसीबी समूह : पहिली परीक्षा ८ ते १३ एप्रिल; दुसरी परीक्षा ६ ते ८ मे २०२७.

पीसीएम समूह : पहिली परीक्षा १६ ते २६ एप्रिल; दुसरी परीक्षा १० ते १५ मे २०२७.

बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम : पहिली परीक्षा २८ ते ३० एप्रिल; दुसरी परीक्षा २७ ते २८ मे २०२७.

 

अन्य अभ्यासक्रमांच्या सीईटीचे वेळापत्रक

 

            एम.एचएमसीटी – २४ मार्च, एमसीए – २७ मार्च, एएसी (कला शिक्षण) – ११ एप्रिल, बी.डिझाईन – १८ एप्रिल, तीन वर्षीय एलएलबी – ४ व ५ मे, डीपीएन/पीएचएन – १८ मे, नर्सिंग – १८ व १९ मे, जीएनएम नर्सिंग – २१ व २२ मे, एमपीएड – ५ जून, एमएड – ६ जून, तर बीएड (जनरल व स्पेशल), बीएड (ईएलसीटी) आणि बीपीएड या अभ्यासक्रमांच्या परीक्षा ८ ते १० जून २०२७ दरम्यान होणार आहेत.

 

            दरम्यान,  तीन वर्षीय एकात्मिक बीएड-एमएड अभ्यासक्रमाची सीईटी यंदा घेतली जाणार नाही. राज्यात हा अभ्यासक्रम एकाच संस्थेत सुरू असून, एकूण ५५ जागांपैकी यंदा केवळ १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर एमपीएड व एमएड व बीएड या परीक्षा जूनमध्ये घेण्यात याव्यात अशी विद्यार्थी व संस्था यांची मागणी होती. त्यामुळे या परीक्षा यावर्षी जूनमध्ये घेण्यात येत आहेत.

 

            सीईटी कक्षाने जाहीर केलेले हे वेळापत्रक संभाव्य असून, विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रक व पुढील सूचनांसाठी सीईटी कक्षाच्या https://cetcell.mahacet.org/ संकेतस्थळाला भेट द्यावी.

000000

काशीबाई थोरात/विसंअ


 

वृत्त क्र. 4436

वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार

– सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

·         डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रशासक पदभार स्वीकारणार

 

            मुंबई, दि. १६ : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे. या बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि प्रशासकीय स्थैर्य देण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रशासक पदभार स्वीकारणार असल्याचे पालकमंत्री तथा सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या बँकेच्या प्रशासकीय, आर्थिक आणि कर्मचारीविषयक विविध अडचणी सोडविण्यास शासनाचे प्राधान्य आहे. बँकेच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी मंत्री डॉ. भोयर यांनी दिली.

 

            वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडीअडचणींबाबत सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, वर्धा जिल्हाधिकारी वान्मथी सी., महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, तसेच सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

        

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi