वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडचणी प्राधान्याने सोडविणार
– सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
· डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रशासक पदभार स्वीकारणार
मुंबई, दि. १६ : वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात आहे. या बँकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि प्रशासकीय स्थैर्य देण्यासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रशासक पदभार स्वीकारणार असल्याचे पालकमंत्री तथा सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. या बँकेच्या प्रशासकीय, आर्थिक आणि कर्मचारीविषयक विविध अडचणी सोडविण्यास शासनाचे प्राधान्य आहे. बँकेच्या प्रश्नांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व मुद्दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी मंत्री डॉ. भोयर यांनी दिली.
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अडीअडचणींबाबत सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सहकार आयुक्त दीपक तावरे, वर्धा जिल्हाधिकारी वान्मथी सी., महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, तसेच सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बँकेच्या आर्थिक स्थितीचा, थकीत कर्जाचा, ठेवींचा, कर्जवसुलीचा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा, कर्मचारीविषयक प्रश्न आणि प्रशासकीय अडचणींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बँकेच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे आणि आवश्यक उपाययोजना प्राधान्याने कराव्यात, असे निर्देश डॉ. भोयर यांनी दिले.
बँकेच्या आर्थिक स्थितीचा सविस्तर आढावा
३१ ऑक्टोबर २०२६ अखेरच्या आर्थिक आकडेवारीनुसार, बँकेच्या राज्यात एकूण नऊ शाखा असून, ६७ कर्मचारी कार्यरत आहेत. बँकेच्या ठेवी ३२६.६४ कोटी रुपये, गुंतवणूक ३३१.२६ कोटी रुपये, तर एकूण निधी १६४.४५ कोटी रुपये आहे. बँकेच्या कर्जविषयक व्यवहारांसह अनुत्पादित कर्जाचे प्रमाण, कर्जवसुली आणि आर्थिक स्थैर्य यासंदर्भातील बाबींवर बैठकीत चर्चा करण्यात आली. बँकेच्या एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण ९०.४४ टक्के असून, थकीत कर्जाची वसुली प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री भोयर यांनी दिले.
शेतकरी, ठेवीदार आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा
शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देणे, कर्जवसुलीला गती देणे, बँकेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा करणे तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करणे या विषयांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. बँकेच्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्यात येईल. संबंधित विभागांनी बँकेच्या प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून त्यावर सकारात्मक कार्यवाही करावी. वर्धा जिल्ह्यातील शेतकरी, ठेवीदार आणि खातेदारांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आर्थिक सक्षमीकरण महत्वाचे आहे. त्यामुळे बँकेच्या सर्व अडचणी सोडविणे ही शासनाची प्राथमिकता असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे सर्व विषय मांडून बँकेला आवश्यक सहकार्य आणि न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी सांगितले.
000
No comments:
Post a Comment