Tuesday, 24 November 2026

डहाणूजवळ महामार्गावर लोखंडी साहित्य पडल्याच्या व्हिडिओप्रकरणी एनएचएआयचा स्पष्टीकरण; ठेकेदाराला सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश

 डहाणूजवळ महामार्गावर लोखंडी साहित्य पडल्याच्या

व्हिडिओप्रकरणी एनएचएआयचा स्पष्टीकरण;

  • ठेकेदाराला सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश

 

मुंबई, दि. २३ : डहाणूजवळ चारोटी येथे महामार्गावर लोखंडी साहित्य पडल्याच्या व्हिडिओप्रकरणात संबंधित छायाचित्र आणि व्हिडिओ काढण्यात आला, त्यावेळी लोखंडी साहित्य बसविण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी वाहनचालकांना सूचना देण्यासाठी ध्वजांसह कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मात्र, चालत्या वाहनातून एका प्रवाशाने हा व्हिडिओ चित्रित केल्याने तेथील संपूर्ण सुरक्षा व्यवस्था त्यात दिसत नसल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) कळविले आहे.

 

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील डहाणूजवळ रस्त्यावर सुमारे ३०० ते ४०० मीटर अंतरापर्यंत लोखंडी पत्रे आणि धातूचे साहित्य पडून असल्याचा व्हिडिओ काल  प्रसारित झाला होता. या साहित्याजवळ पुरेशा सूचना फलकांची आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची व्यवस्था नसल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) स्पष्टीकरण दिले आहे.

 

अच्छाड ते दहिसर या महामार्गाच्या भागाची जबाबदारी एनएचएआयच्या ठाणे प्रकल्प अंमलबजावणी विभागाकडे (पीआययू) आहे. या मार्गावर जे. इन्फ्राटेक या ठेकेदार कंपनीकडून विविध ठिकाणी काम सुरू आहे. कामाच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी कर्मचारी आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

 

या घटनेची गंभीर दखल घेत एनएचएआयने संबंधित ठेकेदार कंपनीला आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. रस्त्याच्या बाजूला असलेले लोखंडी साहित्य व्यवस्थित रचून सुरक्षित ठेवावे, काम सुरू असलेल्या ठिकाणी सूचना फलक, बॅरिकेड्स, दिशादर्शक पट्ट्या, ब्लिंकर्स आणि वाहतूक नियंत्रित करणारे कर्मचारी तैनात करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

 

तसेच, बांधकामाचे साहित्य किंवा यंत्रसामग्रीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्यासही सांगण्यात आले आहे. महामार्गावरील वाहनचालक आणि कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सर्व नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

 

या कामावर प्राधिकरणाच्या अभियंत्यांकडून नियमित देखरेख ठेवण्यात येणार असून, सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी केली जाणार आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना संबंधित कंपनीला देण्यात आल्याचे एनएचएआयने स्पष्ट केले आहे.

0000


 


No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi