सिंहस्थ धर्मध्वजावरील शुभचिन्हांना विशेष महत्त्व
सिंहस्थ धर्मध्वजावर सूर्य, चंद्र, बृहस्पती, सिंह, मगर, ॐकार, स्वस्तिक, घंटा आदी धार्मिक आणि ज्योतिषीय प्रतीकांचा समावेश आहे. या प्रत्येक प्रतीकामागे धार्मिक श्रद्धा आणि पौराणिक संदर्भ आहेत.
सूर्य आणि चंद्र ही प्रतीके अमृतकुंभाच्या रक्षणाशी संबंधित मानली जातात. बृहस्पती आणि सिंह ही प्रतीके सिंहस्थाच्या ज्योतिषीय कालगणनेशी जोडलेली आहेत. मगर हे गोदावरीच्या तीर्थपरंपरेचे प्रतीक आहे. ॐकार आणि स्वस्तिक ही चिन्हे आध्यात्मिकता, मांगल्य आणि कल्याणाचा संदेश देतात. धर्मध्वजावरील बारा घंटा, दहा दिशा आणि 'ह्रीं' हे बीजाक्षर यांनाही विशेष धार्मिक व प्रतीकात्मक महत्त्व आहे.
अशा विविध प्रतीकांनी युक्त धर्मध्वज सिंहस्थ कुंभमेळ्याच्या प्राचीन परंपरेचे आणि त्र्यंबकेश्वरच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाचे दर्शन घडवितो.
शंखनाद, मंत्रोच्चार आणि जयघोषात धर्मध्वजारोहण
धर्मध्वज पूजनानंतर शंखनाद करून ध्वजाची आरती करण्यात आली. त्यानंतर जगद्गुरू शंकराचार्य आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी धर्मध्वजाची प्रदक्षिणा केली. यावेळी भगवान त्र्यंबकेश्वराची प्रार्थना करण्यात आली.
पुरोहितवृंदांच्या मंत्रोच्चारांत, शंखनाद आणि धार्मिक जयघोषात धर्मध्वजारोहणाचा सोहळा उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात संपन्न झाला. उपस्थित साधू-महंत आणि भाविकांनी या पवित्र सोहळ्याचा अनुभव घेतला.
धर्मध्वजारोहणानंतर पवित्र गोदावरीची आरती करण्यात आली. त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक परंपरेत विशेष स्थान असलेल्या या धर्मध्वजारोहण सोहळ्याने सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविले.
No comments:
Post a Comment