· पैठणीच्या समृद्ध विणकाम परंपरेची घेतली माहिती; महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि पर्यटनवैभवाचे सादरीकरण
मुंबई, दि. 31 महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व 2026 च्या निमित्ताने आयोजित उपक्रमात पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे विशेष पर्यटन दालन उभारण्यात आले आहे. या दालनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.
या भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक हातमागावरील देखण्या पैठणी साड्यांची पाहणी केली. पैठणी विणकामामागील कलाकुसर, पारंपरिक तंत्र, त्यातील बारकावे आणि महाराष्ट्राच्या समृद्ध वस्त्रपरंपरेची त्यांनी माहिती जाणून घेतली. या माध्यमातून महाराष्ट्राच्या पारंपरिक कला, हस्तकला, सांस्कृतिक वारसा आणि कारागिरांच्या कौशल्याचे दर्शन त्यांना घडले. पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक विजय जाधव आणि त्यांच्या टीमने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
राष्ट्रीय एकता दिन आणि भारत पर्व 2026 च्या निमित्ताने गुजरातमधील केवडिया (एकतानगर) येथे 1 ते 15 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित या उपक्रमात महाराष्ट्र पर्यटन विभाग सहभागी होत आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या या विशेष दालनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे, समृद्ध सांस्कृतिक वारसा, पारंपरिक कला, खाद्यसंस्कृती आणि हस्तकलेचे दर्शन देशभरातील पर्यटकांना घडविण्यात येत आहे.
या उपक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाचे प्रतिनिधी म्हणून छत्रपती संभाजीनगरचे विभागीय उपसंचालक विजय जाधव उपस्थित आहेत. दालनात महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळांची माहिती देणारी माहितीपत्रके आणि पर्यटनविषयक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच पैठणी विणकामाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक, महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचे स्टॉल, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि हस्तकलेच्या विविध वस्तू ही दालनाची प्रमुख आकर्षणे आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम), दादर येथील किचन स्टुडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचेही सादरीकरण करण्यात येत आहे. याशिवाय, महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment