Wednesday, 14 October 2026

मुंबई महापालिका मुख्यालयात खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचे प्रदर्शन

 मुंबई महापालिका मुख्यालयात खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचे प्रदर्शन

·        मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते उद्घाटन

  • ग्रामीण उद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध
  • १५ ऑक्टोबरपर्यंत प्रदर्शन सुरू

 

मुंबई, दि. १३ : ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांच्या हस्ते आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते गणेश खणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

 

हे प्रदर्शन १३ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील उपहारगृह परिसरात तसेच जुन्या व नव्या इमारतींना जोडणाऱ्या पुलावर आयोजित करण्यात आले आहे.

 

या प्रदर्शनात मंडळाच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या ग्रामीण व लघुउद्योजकांच्या विविध दर्जेदार उत्पादनांची विक्री व मांडणी करण्यात आली आहे. यामध्ये खादीचे रेडिमेड कपडे, मध, पापड, लोणची, विविध खाद्यपदार्थ, हाताने तयार केलेले कापडी व रेझिनचे दागिने, मॅग्नेट्स, आधुनिक चप्पल तसेच हस्तनिर्मित फुले आदी उत्पादनांचा समावेश आहे.

 

ग्रामीण कारागीर आणि लघुउद्योजकांना त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देणे आणि ग्राहकांपर्यंत स्थानिक उत्पादनांचा प्रसार करणे, हा या प्रदर्शनामागील उद्देश आहे.

 

या उद्घाटनप्रसंगी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार डांगर आणि नित्यानंद पाटील उपस्थित होते.

 

मुंबईकरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण उद्योजकांच्या उत्पादनांची खरेदी करावी आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi