Thursday, 15 October 2026

शेतकऱ्यांना आधुनिक बाजारपेठ, प्रक्रिया सुविधा आणि निर्यात संधी उपलब्ध करून देणार

 शेतकऱ्यांना आधुनिक बाजारपेठ, प्रक्रिया सुविधा आणि

निर्यात संधी उपलब्ध करून देणार

–पणन मंत्री जयकुमार रावल

  • महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा

मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्कच्या (मॅग्नेट) २.० या विस्तारित टप्प्यात राज्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक बाजारपेठा, मोठ्या क्षमतेच्या प्रक्रिया सुविधांचे जाळे आणि निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. प्रकल्पाची प्रशासकीय आणि वित्तीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करून आशियाई विकास बँकेकडील पुढील मंजुरीसाठी आवश्यक कार्यवाही गतिमान करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा मंत्री रावल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत प्रकल्पाची सद्यस्थिती, आतापर्यंतची प्रगती आणि प्रस्तावित मॅग्नेट २.० प्रकल्पाच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करण्यात आली.

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत आतापर्यंत ३३ हजारांहून अधिक फलोत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. काढणीपश्चात पायाभूत सुविधांच्या ६२ उपप्रकल्पांना वित्तसाहाय्य करण्यात आले असून, १५३ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि मूल्यसाखळीतील घटकांना सवलतीच्या व्याजदराने आर्थिक मदत देण्यात आली आहे. तसेच ६७ शेतकरी उत्पादक कंपन्यांना नावीन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यात आले आहे. याशिवाय २१ कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या सुविधांचे आधुनिकीकरण आणि राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या तळेगाव येथील सुविधांचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे सुमारे २.३२ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ झाला आहे. लाभार्थ्यांमध्ये ४८ टक्के महिलांचा सहभाग असून, सुमारे ४ हजार ३०० रोजगार निर्माण झाले आहेत. प्रकल्पामुळे २७१ कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi