रुग्णालयांच्या उपचारांचे दरपत्रक ठळकपणे प्रदर्शित करण्याचे आवाहन
वैद्यकीय व आयुष व्हिसावर भारतात येणाऱ्या परदेशी रुग्णांसाठीही पॅकेजचे शुल्क पारदर्शक ठेवण्याचे आवाहन
नवी दिल्ली, दि. १२ : रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांमध्ये उपलब्ध उपचार, सेवा व सुविधांचे शुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याची व्यवस्था सुनिश्चित करावी, असे आवाहन केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केले आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव पुण्या सलीला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून संबंधित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
रुग्णांना उपचारांच्या संभाव्य खर्चाची स्पष्ट माहिती मिळावी, त्यांना उपचारांबाबत योग्य निर्णय घेता यावा तसेच वैद्यकीय बिलांवरून उद्भवणारे गैरसमज आणि वाद कमी व्हावेत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आरोग्यसेवेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवून रुग्णांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे
स्थानिक भाषा आणि इंग्रजीत दर प्रदर्शित करणे बंधनकारक
नैदानिक आस्थापना (नोंदणी व विनियमन) अधिनियम, २०१० आणि त्याअंतर्गत लागू असलेल्या नियमांनुसार, हा कायदा लागू असलेल्या राज्यांतील वैद्यकीय संस्थांनी उपलब्ध सेवा व सुविधांचे दर रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना सहज दिसतील अशा ठिकाणी प्रदर्शित करणे आवश्यक आहे. हे दर स्थानिक भाषेसह इंग्रजीतही प्रदर्शित करणे अपेक्षित आहे.
ज्या राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये हा कायदा लागू नाही, तेथे संबंधित राज्यांच्या स्वतंत्र नियामक चौकटींनुसार वैद्यकीय संस्थांचे नियमन केले जाते. या चौकटींमध्येही आरोग्यसेवांचे दर प्रदर्शित करण्यासंबंधी तरतुदी आहेत. आरोग्य हा राज्याच्या अखत्यारीतील विषय असल्याने संबंधित नियमांची अंमलबजावणी आणि देखरेख करण्याची जबाबदारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची आहे.
No comments:
Post a Comment