Saturday, 12 September 2026

पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करणार

 पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये आयोजित करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

  • महाराष्ट्र मंडळाच्या सोहळ्यात 'ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्काराने उपमुख्यमंत्री सन्मानित

 

लंडन दि ११: जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील 'विश्व मराठी साहित्य संमेलन' लंडनमध्ये आयोजित करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. लंडन येथील ऐतिहासिक अशा महाराष्ट्र मंडळाने त्यांचा 'ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार देऊन सन्मान केला. यावेळी महाराष्ट्र भवनातील वातावरण मराठीमय होऊन गेले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्र्यांचा हा गौरव करण्यात आला. सातासमुद्रापलीकडे मराठी माणसाने झेंडा फडकवला आहे, त्यामुळे महाराष्ट्र मंडळाच्या पाठीशी सरकार आणि एकनाथ शिंदे म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास त्यांनी दिला.

 

कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भवनात मोठी गर्दी झाली होती. तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि मराठी परंपरेनुसार उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी जय महाराष्ट्र, जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. उपमुख्यमंत्र्यांनीही या जोशपूर्ण स्वागताचे भाषणात कौतुक केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी लंडनस्थित सर्व मराठी जनाला गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. आपली संस्कृती, आपला ठसा हा उमटवावाच लागेल असेही ते म्हणाले.

 

यावेळी निवृत्त सनदी अधिकारी भूषण गगराणी, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, महाराष्ट्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉ गोविंद कानेगावकर, मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, मराठी भाषा संचालक श्यामकांत देवरे, मराठी चित्रपट निर्माते अभिनेते मंगेश देसाई त्याचप्रमाणे इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi