प्रशिक्षण धोरणात आमुलाग्र बदलाने कौशल्यवृद्धीला चालना
- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
· आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर
मुंबई,दि.२१: राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या मनुष्यबळाचे ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन अधिक सक्षम करणे हा प्रशिक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे. या प्रशिक्षण प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आल्याने कौशल्यवृद्धीला चालना मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. नुकतेच आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर केल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशिक्षण धोरणानुसार आरोग्य विभागातील सर्व स्तरांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येणार असून प्रशिक्षण अधिक परिणामकारक व एकसंध करण्यासाठी राज्यातील प्रशिक्षण संस्थांना सार्वजनिक आरोग्य सेवा प्रशिक्षण संचालनालय, नागपूर यांच्या तांत्रिक व प्रशासकीय नियंत्रणाखाली आणण्यात येणार आहे. प्रशिक्षणाला केवळ प्रशासकीय बाब न मानता मनुष्यबळ विकासातील महत्वाची गुंतवणूक म्हणून या धोरणात स्थान देण्यात आले आहे. राज्यातील प्रशिक्षण व्यवस्थेत एकसूत्रता आणून आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात आला आहे.
तीन स्तरांवर प्रशिक्षणाची व्यवस्था
राज्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था (SIHFW), नागपूर ही सार्वजनिक आरोग्य विभागाची नोडल प्रशिक्षण संस्था राहणार आहे. विभागीय, जिल्हा आणि तालुका स्तरावरील प्रशिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येणार असून आवश्यकतेनुसार नवीन प्रशिक्षण केंद्रेही निर्माण केली जाणार आहेत.
No comments:
Post a Comment