Monday, 31 August 2026

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांची ‘शब्द सुरांची मैफल’ · ४ सप्टेंबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांची शब्द सुरांची मैफल

·         ४ सप्टेंबर रोजी रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

 

मुंबई, दि. ३१  : ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांचा सुरेल आविष्कार रसिकांना अनुभवता यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने शब्द सुरांची मैफलया विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार,  ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई ४०००२५ येथे होणार आहे.

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या प्रदीर्घ आणि समृद्ध संगीत कारकिर्दीचा गौरव करण्यासोबतच त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा सांगीतिक वारसा रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी संगीत क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीतशैलीने स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या अशोक पत्की यांच्या विविध लोकप्रिय गीतांचा सांगीतिक प्रवास या मैफलीच्या माध्यमातून उलगडणार आहे.

या कार्यक्रमास पद्मश्री अशोक सराफ, निवेदिता जोशी-सराफ, साधना सरगम आणि स्वप्नील बांदोडकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमात धनंजय म्हसकर, अनघा पेंडसे, प्राजक्ता सातार्डेकर आणि अभिषेक नलावडे हे गायक आपल्या सादरीकरणातून अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांना सुरेल उजाळा देणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन मयुरेश साने करणार आहेत. कार्यक्रमाच्या वाद्यवृंदामध्ये तबला मयुरेश शेर्लेकर, ढोलकी व हँडसॉनिक जयंता बगाडे, ऑक्टोपॅड सिद्धार्थ कदम, बासरी संदीप कुलकर्णी, कीबोर्ड झंकार कानडे व अक्षय कावळे यांचा सहभाग राहणार आहे. हार्मोनियम आणि संगीत संयोजन विनय चेऊलकर यांचे आहे. गायक आणि वादकांच्या सुरेल सादरीकरणातून अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांचा समृद्ध ठेवा रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशातील संगीतपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच ज्येष्ठ व मान्यवर कलाकारांच्या कलाकृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या प्रदीर्घ आणि समृद्ध संगीत कारकिर्दीचा गौरव करण्यासोबतच त्यांच्या संगीतबद्ध गीतांचा सांगीतिक वारसा रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत संगीत, नाट्य, लोककला आणि विविध सांस्कृतिक कलाप्रकारांच्या जतन, संवर्धन व प्रसारासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

शब्द सुरांची मैफलया कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार असून, प्रवेश विनामूल्य आहे. मुंबईतील संगीतप्रेमी, कलारसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या संगीतबद्ध गीतांची ही विशेष मैफल अनुभवावी, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक  प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi