कल्याणेश्वर मंदिर परिसरात पार्किंगची व्यवस्था वाढवावी
नागपूर येथील ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेल्या कल्याणेश्वर मंदिर महाल परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याचा आढावा घेताना आवश्यकता विचारात घेऊन पार्किंगची व्यवस्था वाढविण्यात यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तथापि, अशा परिसरात यांत्रिक पार्किंगचा वापर व्यवहार्य ठरत नसल्याने साध्या पार्किंगची व्यवस्था असावी, असे ते म्हणाले.
नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यावेळी यापूर्वी शिखर समितीच्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनांनुसार मंदिर विकास आराखड्यात करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिली. त्यानुसार बेसमेंटमधील यांत्रिक वाहनतळ वगळून त्याठिकाणी दोन तळघरांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच निवासी व्यवस्था वगळण्यात आली असून मंदिराच्या शिखराचे बांधकाम प्रस्तावात समाविष्ट करण्यात आले आहे. या सुधारणांनंतर प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ७२.४९ कोटी रुपये इतका निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या खर्चास शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
कल्याणेश्वर मंदिर हे नागपूरमधील ऐतिहासिक आणि धार्मिक श्रद्धास्थान असून प्रस्तावित विकास आराखड्यात मंदिर परिसराचे हेमाडपंथी स्थापत्यशैलीनुसार सुशोभीकरण, भव्य सभामंडप, बहुउद्देशीयसभागृह, महाप्रसादासाठी स्वतंत्र सुविधा, प्रशासकीय कार्यालये, वेदशाळा, योगशाळा, प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, भाविकांसाठी विविध सुविधा तसेच दोन स्तरांवरील तळघरांचा समावेश करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment