अमरावती महापालिकेतील कचरा उचल निविदेची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी
- मंत्री उदय सामंत
मुंबई, दि. 10 : अमरावती महानगरपालिकेच्या कचरा उचल निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेची विभागीय आयुक्तांच्या स्तरावर सखोल चौकशी करण्यात येईल. चौकशीत गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर 90 दिवसांच्या आत कारवाई केली जाईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य धीरज लिंगाडे यांनी म.वि.प. नियम 97 अन्वये या विषयी विधानपरिषदेत अल्पकालीन चर्चा उपस्थितीत केली होती. त्यास उत्तर देताना ते बोलत होते.
मंत्री सामंत म्हणाले की, महानगरपालिकेने कचरा उचलण्यासाठी दोन भागांत निविदा काढली होती. त्यामध्ये थेट कचरा उचलणे आणि घराघरातून कचरा संकलन करणे, अशा दोन स्वतंत्र भागांचा समावेश होता. निविदा प्रक्रियेदरम्यान 'ए' पार्टचे तसेच 'बी' पार्टमधील झोन क्रमांक 3 चे 50 टक्के देयक अदा करण्यात आले. या निविदेचा मासिक खर्च 35 कोटी रुपयांवरून अचानक 45 कोटी रुपयांपर्यंत वाढल्याबाबतही प्रश्न उपस्थित झाला. तसेच महानगरपालिकेच्या स्थायी समितीनेही या निविदीवर आक्षेप नोंदविला असून, प्रशासकाकडून प्रस्ताव पाठविल्यानंतरही स्थायी समितीने त्यास मंजुरी दिलेली नाही.
संबंधित प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणली जाईल. चौकशीत कोणताही गैरप्रकार अथवा अनियमितता सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री उदय सामंत यांनी दिली.
0000
No comments:
Post a Comment