Friday, 3 July 2026

संपूर्ण मुंबईतील मॅनहोलची आठ दिवसांत १०० टक्के तपासणी केली जाणार

 संपूर्ण मुंबईतील मॅनहोलची आठ दिवसांत १०० टक्के तपासणी केली जाणार

- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

 

मुंबई, दि. २ : साकीनाका येथे उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून या प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगर) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, प्रथमदर्शनी जबाबदार आढळलेल्या चार अधिकाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. तसेच मुंबईतील सर्व मॅनहोलची पुढील आठ दिवसांत १०० टक्के तपासणी करून सुरक्षिततेचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, २ जुलै रोजी साकीनाका येथे उघड्या मलनिसारण मॅनहोलमध्ये पडून ५५ वर्षीय असलम इसाक शेख यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह सुमारे १०० फूट अंतरावरील मलनिसारण वाहिनीच्या मॅनहोलमधून अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात आला.

पावसाळ्यापूर्वी सर्व मॅनहोल, त्यावरील जाळ्या आणि झाकणे सुस्थितीत ठेवण्याबाबत महानगरपालिका प्रशासनाला वारंवार सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच यासंदर्भात अनेक बैठका घेऊन आढावा देखील घेण्यात आला होता. संबंधित मॅनहोलवर जाळी बसविण्याचे काम सुरू करण्यासाठी कंत्राटदाराने वाहन, जाळी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले होते.

या घटनेच्या प्राथमिक तपासात कंत्राटदाराच्या कामगारांनी जाळी बसविण्यासाठी मॅनहोलचे झाकण उघडले; मात्र त्यापूर्वीच एक पादचारी उघड्या मॅनहोलमध्ये पडल्याचे निदर्शनास आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळी आवश्यक बॅरिकेटिंग किंवा ट्रायपॉड नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काम सुरू असताना सुरक्षिततेच्या उपाययोजनांमध्ये गंभीर त्रुटी राहिल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगर) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, घटना घडण्याची कारणे, जबाबदार अधिकारी तसेच भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत समिती सात दिवसांत अहवाल सादर करणार आहे.

पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेले काम विलंबाने हाती घेणे, सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणे आणि पुरेसे पर्यवेक्षण न ठेवणे यासाठी प्रथमदर्शनी जबाबदार ठरलेल्या सहाय्यक आयुक्त धनाजी हेर्लेकर, सहाय्यक दुय्यम अभियंता दीपक चौगुले, कनिष्ठ अभियंता अभिजित चौगुले आणि सहाय्यक अभियंता उत्तम पाटील यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

या कामाचा कंत्राटदार सुरक्षिततेची काळजी घेण्यात अपयशी ठरल्याने त्याच्याविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मॅनहोलची पुढील आठ दिवसांत १०० टक्के तपासणी करून त्यांच्या सुरक्षिततेबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सात परिमंडळीय उपायुक्त आणि २६ विभागीय सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्याचे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi