मुंबईला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनविण्यासाठी शासन कटिबद्ध
- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार
मुंबई हे स्वप्नांचे, आनंदाचे आणि सर्जनशीलतेचे शहर असून जगभरातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सर्जनशील कलाकारांनी मुंबई व महाराष्ट्रातील सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री डॉ. मुरुगन यांचे आभार मानताना तीन महत्त्वाच्या उपक्रमांचा विशेष उल्लेख केला. ‘वेव्ह्ज’ या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल परिषदेची सुरुवात मुंबईत करण्यात आली असून ती सर्जनशील क्षेत्रासाठी मोठी संधी ठरत आहे. तसेच देशातील पहिले ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (आयआयसीटी) मुंबईत सुरू करण्यात आले आहे. याशिवाय मराठी चित्रपटांना जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईच्या सर्जनशीलतेचा उल्लेख करताना मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, हे शहर नवकल्पना आणि संस्कृतीसाठीही ओळखले जाते. येथील सर्जनशीलता आणि नवोन्मेषाचा अनुभव देश-विदेशातील पाहुण्यांना घेता येईल.
चित्रपटसृष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचे सांगून मंत्री ॲड.शेलार म्हणाले की, महाराष्ट्रातील शासकीय जागांवर चित्रिकरणासाठी निर्मात्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच विविध विभागांकडून परवानग्या मिळविण्यासाठी ‘वन विंडो सिस्टीम’ सुरू करण्यात आली असून सर्व परवानग्या मिळविण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे.
No comments:
Post a Comment