Tuesday, 16 June 2026

सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रयागराज महाकुंभ 2025

 सन 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, प्रयागराज महाकुंभ 2025 च्या अनुभवाच्या आधारे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांपैकी मोठ्या संख्येने भाविक श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देण्याची शक्यता आहे. संभाव्य वाढत्या गर्दीच्या अनुषंगाने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उभारणीची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत.

 

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे नवीन सभामंडप व पायरी मार्गाचे काम सुरु असल्याने, देवस्थान ट्रस्टने ९ जानेवारी २०२६ पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सदर बंद कालावधीस  ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मुख्य मंदिरासमोरील सभामंडपाचे काम पूर्ण करण्यासाठी सामान्य परिस्थितीत सुमारे एक वर्षाचा कालावधी अपेक्षित होता. तथापि, भीमाशंकर संस्थान, स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक यांच्या सहकार्यामुळे तसेच रात्रंदिवस अखंड काम सुरु ठेवण्यात आल्याने हे काम केवळ पाच महिन्यांत पूर्णत्वास आले आहे.

 

मुख्य सभामंडपाचे काम पूर्ण करण्यात आले असून दर्शनबारी उभारणी, परिसर स्वच्छता, भाविकांसाठी सुविधा व गर्दी व्यवस्थापनासाठी आवश्यक पायाभूत कामे पूर्ण झाली आहे. सर्व कामे अंतिम टप्प्यात असून उर्वरित किरकोळ कामे जलदगतीने पूर्ण करुन बांधकाम साहित्य, दगड व यंत्रसामग्री हटवून परिसर भाविकांसाठी मोकळा करण्याच्यादृष्टीने श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट यांनी मंदीर दर्शनाकरिता खुले केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi