सेल्फ केअरचा अर्थ केवळ स्वतःला दूर ठेवणे नसून, स्वतःच्या भावना ओळखून त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे असा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. व्यक्तीने स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टी दैनंदिन जीवनात समाविष्ट करणे, तसेच संतुलित जीवनशैली राखणे महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. सत्रात मानसिक आरोग्य सेवेत सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात भाषा, आर्थिक स्थिती, ग्रामीण-शहरी पार्श्वभूमी यांसारख्या घटकांचा व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. ‘इंटरसेक्शनॅलिटी’ या संकल्पनेवर भाष्य करताना प्रत्येक व्यक्ती विविध ओळखी (identity) घेऊन येत असल्याने उपचार करताना त्या सर्व घटकांचा विचार करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. रुग्णाला केवळ ‘केस’ म्हणून न पाहता एक व्यक्ती म्हणून समजून घेणे आणि त्याच्या दैनंदिन जीवनशैलीनुसार उपचार योजना आखणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी जीवनशैलीतील बदलांवरही भर देण्यात आला. यामध्ये मोबाईलचा मर्यादित वापर, निसर्गाशी संपर्क, पुरेशी झोप, कुटुंबीय व मित्रांशी संवाद, तसेच संगीत, वाचन यांसारख्या उपक्रमांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
एकूणच, मानसिक आरोग्य क्षेत्र अधिक प्रभावी व सर्वसमावेशक करण्यासाठी संदर्भाधारित शिक्षण, मानवकेंद्रित दृष्टिकोन, प्रभावी संवाद, तसेच प्रणाली-स्तरावर (system-level) समर्थन आवश्यक असल्याचे या सत्रातून स्पष्ट झाले.
No comments:
Post a Comment