Tuesday, 27 October 2026

भ्रष्टाचार निर्मूलनाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून, समाजातील प्रत्येक घटकाचीदि. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर

 भ्रष्टाचार निर्मूलनाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून, समाजातील प्रत्येक घटकाची आहे. भ्रष्ट्राचार मुक्त समाजाची सुरुवात स्वतःपासून करण्याचा संकल्प प्रत्येकाने करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

दि. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून ‘समृध्दीसाठी सत्यनिष्ठा’ हे या सप्ताहाचे ब्रीदवाक्य आहे.

गुणवत्तापूर्ण औषधांसाठी आरोग्य विभागाचे ड्र्ग डिटेक्शन मशीन

 गुणवत्तापूर्ण औषधांसाठी आरोग्य विभागाचे ड्र्ग डिटेक्शन मशीन

-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

  • २ मिनिटात तपासणार औषधाची गुणवता; ८ विभागात कार्यान्वित

 

मुंबई, दि. २६ : नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देताना डॉक्टरांची उपलब्धता, पायाभूत सुविधा आणि औषधांचा पुरवठा यांच्याइतकेच औषधांचे गुणवत्ता नियंत्रण महत्वाचे आहे. नागरिकांना शासकीय आरोग्य संस्थांमधून गुणवत्तापूर्ण औषधांचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील आठ विभागांत आधुनिक औषध शोध यंत्र (ड्र्ग डिटेक्शन मशीन)  कार्यान्वित केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाला पुरवठा होत असलेली औषधे गुणवत्तापूर्ण असावीत यासाठी पहिल्यांदाच ड्र्ग डिटेक्शन यंत्रणा वापरण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

या यंत्रणेच्या माध्यमातून औषधांच्या नमुन्यांची प्राथमिक तपासणी करून संशयित अथवा गुणवत्तेबाबत त्रुटी आढळणारे नमुने पुढील प्रयोगशाळीय पडताळणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. औषध खरेदी आणि पुरवठा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि नियमित देखरेख निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मंत्री आबिटकर म्हणाले.

वाढवण बंदराजवळ प्रस्तावित आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय कृषी बाजारपेठेला जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र म्हणून

 वाढवण बंदराजवळ प्रस्तावित आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय कृषी बाजारपेठेला जागतिक दर्जाचे कृषी व्यापार केंद्र म्हणून विकसित करण्यातील गुंतवणुकीच्या संधींवर या भागीदारीत भर देण्यात आला आहे. संतुलित प्रादेशिक विकास आणि स्थानिक रोजगारनिर्मितीसाठी जागतिक गुंतवणूकदारांनी मुंबई व पुण्याबरोबरच वाढती विमानतळ, महामार्ग आणि रेल्वे जोडणी असलेल्या द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांकडेही लक्ष केंद्रित करावे, अशी भूमिका मांडण्यात आली.

या सहकार्यामुळे जागतिक भांडवल, प्रगत तंत्रज्ञान आणि दर्जेदार आरोग्यसेवा राज्यातील शेतकरी, ग्रामीण समुदाय आणि प्रादेशिक केंद्रांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार असून, देशातील प्रमुख गुंतवणूक केंद्र म्हणून महाराष्ट्राचे स्थान अधिक बळकट होणार आहे.

परकीय थेट गुंतवणूक, हरित वित्त आणि ग्रामीण आरोग्याला चालना देण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार

 परकीय थेट गुंतवणूक, हरित वित्त आणि ग्रामीण आरोग्याला चालना देण्यासाठी त्रिपक्षीय सामंजस्य करार

महाराष्ट्रातील थेट परकीय गुंतवणूक, जागतिक क्षमता केंद्रांचा विस्तार, हरित वित्तपुरवठा, तंत्रज्ञानाधारित नवकल्पना आणि ग्रामीण आरोग्य सुविधांना चालना देण्यासाठी राज्य शासन, डीबीएस बँक इंडिया लिमिटेड आणि आयआयकेअर फाउंडेशन यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला. मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात हा करार झाला.

पणन, राजशिष्टाचार आणि थेट परकीय गुंतवणूक मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत हे करार झाले. यावेळी राज्य शासनाच्या वतीने राजशिष्टाचार, थेट परकीय गुंतवणूक, अनिवासी भारतीय व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संपर्क विभागाचे सचिव डॉ. राजेश गवांदे, डीबीएस बँक इंडिया लिमिटेडच्या वतीने कार्यकारी संचालक तथा इंडिया हेड ऑफ गव्हर्नमेंट बिझनेस राजीव बग्गा आणि आयआयकेअर फाउंडेशनच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल भापकर यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारातून बिगर-वित्तीय सहकार्याची चौकट उभारण्यात आली आहे.


शासन प्रादेशिक दळणवळण आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन प्रादेशिक दळणवळण आणि पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर देत आहे. प्रादेशिक विमानतळांचा विस्तार, राष्ट्रीय व राज्य महामार्गांची सुधारणा, द्रुतगती मार्गांचे जाळे, रेल्वेचे आधुनिकीकरण आणि वंदे भारत रेल्वे सेवांची वाढती जोडणी यामुळे महानगरांबाहेर गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. प्रादेशिक औद्योगिक उद्याने, कृषी प्रक्रिया समूह, लॉजिस्टिक्स केंद्रे, आरोग्य सुविधा, शैक्षणिक संस्था, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प आणि जागतिक क्षमता केंद्रांमध्ये गुंतवणुकीला मोठा वाव आहे. या गुंतवणुकीमुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होऊन महानगरांवरील स्थलांतराचा ताण कमी होईल आणि सर्वसमावेशक व शाश्वत आर्थिक विकासाला चालना मिळेल. दुष्काळ प्रतिरोधक्षमता, नदी पुनरुज्जीवन, हवामानानुकूल शेती, प्रादेशिक पायाभूत सुविधा आणि कृषी निर्यात विकासाशी संबंधित प्रकल्पांची संयुक्त रूपरेषा विभाग व संस्थात्मक भागीदारांनी तयार करावी. आंतरराष्ट्रीय भांडवल, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक कौशल्याची सांगड महाराष्ट्रातील शेतकरी, ग्रामीण समुदाय आणि उदयोन्मुख शहरांच्या विकासाशी घालण्याचे राज्य शासनाचे उद्दिष्ट असल्याचे मंत्री रावल यांनी यावेळी स्पष्ट केले.

वाढवण बंदराजवळील आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय कृषी बाजारासाठी गुंतवणूक व धोरणात्मक भागीदारीचे

 वाढवण बंदराजवळील आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय कृषी बाजारासाठी

गुंतवणूक व धोरणात्मक भागीदारीचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचे आवाहन

 

मुंबई, दि. २६ - पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराजवळ जागतिक दर्जाचा आंतरराष्ट्रीय बहुउद्देशीय कृषी बाजार विकसित करण्याचा राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सिंगापूरमधील गुंतवणूकदार, सार्वभौम गुंतवणूक संस्था आणि जागतिक वित्तीय संघटनांशी असलेल्या डीबीएस बँकेच्या नेटवर्कच्या माध्यमातून बँकेने गुंतवणूक व धोरणात्मक भागीदारी आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यासमवेत डीबीएस बँक व आयआयकेअर फाउंडेशनच्या प्रतिनिधींची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी पणन मंत्री रावल बोलत होते.

*जिल्हा परिषद, ठाणे येथे दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ*

 *जिल्हा परिषद, ठाणे येथे दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ*


*‘समृद्धीसाठी सचोटी’ या संकल्पनेतून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी जनजागृती*


ठाणे प्रतिनिधी : 

प्रशासनात पारदर्शकता, सचोटी आणि उत्तरदायित्व वृद्धिंगत करण्यासह भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालणे आणि नागरिकांचा शासनव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणे या उद्देशाने जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत आज, सोमवार, दि. २६ ऑक्टोबर, २०२६ पासून दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा सप्ताह दि. १ नोव्हेंबर, २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. यंदाची संकल्पना ‘समृद्धीसाठी सचोटी’ (Probity for Prosperity) अशी आहे.


या सप्ताहांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावर विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शासकीय कामकाजात पारदर्शकता राखणे, प्रशासकीय निर्णयप्रक्रियेत उत्तरदायित्व सुनिश्चित करणे, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे आणि भ्रष्टाचारविरोधी मूल्यांचा प्रसार करणे यावर भर देण्यात येणार आहे.


सप्ताहाच्या अनुषंगाने प्रलंबित तक्रारींचा निपटारा, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, क्षमता बांधणी कार्यक्रम, डिजिटल उपक्रम आणि कंत्राट व्यवस्थापन या प्रतिबंधात्मक दक्षता उपाययोजनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच ग्रामसभांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करणे, सचोटी व पारदर्शकतेविषयी मार्गदर्शन करणे, भ्रष्टाचारविरोधी विषयांवर निबंध, वादविवाद, प्रश्नमंजुषा, चित्रकला, व्यंगचित्र आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करणे, लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे संदेश पोहोचविणे असे उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


याबाबत माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सांगितले की, दक्षता जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये सचोटी, पारदर्शकता व भ्रष्टाचारविरोधी मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाजात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. तसेच नागरिकांना गुणवत्तापूर्ण व वेळेत सेवा देताना सचोटीची मूल्ये जपावीत आणि दक्षता जनजागृती सप्ताहातील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी नमूद केले.


जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत सर्व संबंधित विभागांनी दक्षता जनजागृती सप्ताह प्रभावीपणे राबवून भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

०००

Featured post

Lakshvedhi