Tuesday, 27 October 2026

*जिल्हा परिषद, ठाणे येथे दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ*

 *जिल्हा परिषद, ठाणे येथे दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ*


*‘समृद्धीसाठी सचोटी’ या संकल्पनेतून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी जनजागृती*


ठाणे प्रतिनिधी : 

प्रशासनात पारदर्शकता, सचोटी आणि उत्तरदायित्व वृद्धिंगत करण्यासह भ्रष्टाचाराला प्रतिबंध घालणे आणि नागरिकांचा शासनव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणे या उद्देशाने जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत आज, सोमवार, दि. २६ ऑक्टोबर, २०२६ पासून दक्षता जनजागृती सप्ताहास प्रारंभ झाला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा सप्ताह दि. १ नोव्हेंबर, २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. यंदाची संकल्पना ‘समृद्धीसाठी सचोटी’ (Probity for Prosperity) अशी आहे.


या सप्ताहांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत स्तरावर विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शासकीय कामकाजात पारदर्शकता राखणे, प्रशासकीय निर्णयप्रक्रियेत उत्तरदायित्व सुनिश्चित करणे, नागरिकांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे आणि भ्रष्टाचारविरोधी मूल्यांचा प्रसार करणे यावर भर देण्यात येणार आहे.


सप्ताहाच्या अनुषंगाने प्रलंबित तक्रारींचा निपटारा, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, क्षमता बांधणी कार्यक्रम, डिजिटल उपक्रम आणि कंत्राट व्यवस्थापन या प्रतिबंधात्मक दक्षता उपाययोजनांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. तसेच ग्रामसभांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करणे, सचोटी व पारदर्शकतेविषयी मार्गदर्शन करणे, भ्रष्टाचारविरोधी विषयांवर निबंध, वादविवाद, प्रश्नमंजुषा, चित्रकला, व्यंगचित्र आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करणे, लोककला व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे संदेश पोहोचविणे असे उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


याबाबत माहिती देताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी सांगितले की, दक्षता जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये सचोटी, पारदर्शकता व भ्रष्टाचारविरोधी मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.


जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाजात प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. तसेच नागरिकांना गुणवत्तापूर्ण व वेळेत सेवा देताना सचोटीची मूल्ये जपावीत आणि दक्षता जनजागृती सप्ताहातील उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी नमूद केले.


जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत सर्व संबंधित विभागांनी दक्षता जनजागृती सप्ताह प्रभावीपणे राबवून भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

०००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi