Tuesday, 6 October 2026

किमान ७० किलोमीटर मेट्रो मार्गिकांच्या पूर्णत्वातून २०२७ हे 'मेट्रो वर्ष' ठरावे

 किमान ७० किलोमीटर मेट्रो मार्गिकांच्या पूर्णत्वातून २०२७ हे 'मेट्रो वर्ष' ठरावे

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         मुंबईच्या दळणवळणाला गती देण्यासाठी मेट्रो आणि उन्नत मार्गिकांच्या कामांना वेग

·         मुख्यमंत्री वॉर रूमच्या बैठकीत पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा

 

            मुंबई, दि. ५ : २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरवून यंदाच्या प्रलंबित कामांसह पुढील वर्षी किमान ७० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण कराव्यात. डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणाऱ्या ३६ किलोमीटर मेट्रो मार्गिकांची व्याप्ती ५० किलोमीटरपर्यंत नेण्यासाठी कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 

 

            पायाभूत सुविधांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पांवरील किमान ५० टक्के काम यांत्रिकीकरणावर आधारित असावे. कौशल्याधारित कामगारांची उपलब्धता निश्चित करून मजुरांच्या तुटवड्यावर यांत्रिकीकरणातून उपाय शोधावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

 

            सह्याद्री अतिथिगृह येथे पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी स्थापन मुख्यमंत्री वॉर रूमच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. बैठकीस नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.

 

            मेट्रो मार्गिका २-ब मधील डी. एन. नगर ते चेंबूर मार्गावरील जुहू सर्कलजवळील गर्डरचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यतेनुसार रविवारी १२ तासांच्या विशेष रस्ता ब्लॉकचे नियोजन करावे. कामाची सद्यस्थिती बघून पुढील रस्ता ब्लॉकचा निर्णय घ्यावा. या कामामुळे नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, याची दक्षता घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

            शिवडी ते वरळी उन्नत मार्गिकेची जोडणी ३१ मे २०२७ पूर्वी पूर्ण करून हा रस्ता नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करावा. कोणताही नवीन रस्ता दुसऱ्या रस्त्याला जोडताना त्या ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी आगाऊ नियोजन करावे. वाकोला जंक्शनवरील वाहतूक कोंडीवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तातडीने उपाय शोधावा. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीची ठिकाणे शोधून तेथे आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

            मुख्यमंत्री म्हणाले, एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि अन्य यंत्रणांनी भूमिगत नागरी सुविधा घटकांचे अद्ययावत ' मॅपिंग ' करावे. नागरी सुविधा किंवा पायाभूत सुविधांची कामे करताना ही माहिती सहज उपलब्ध होऊन प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी कमी होईल, अशी यंत्रणा विकसित करावी.

 

            पायाभूत सुविधांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी नागरिक आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक फलक, बॅरिकेड्स आणि अन्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात. प्रकल्पस्थळी सर्व सुरक्षा व्यवस्था करणारी स्वतंत्र कंपनी निर्माण करून या सेवांसाठी अत्यल्प दराचे नवीन व्यवसाय प्रारूप विकसित करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केले.

राज्य-विशिष्ट कायद्यांचा आढावा हा राष्ट्रीय महिला आयोगाच्या महत्त्वाच्या कार्याचा भाग

 राज्य-विशिष्ट कायद्यांचा आढावा हा राष्ट्रीय महिला आयोगाच्या महत्त्वाच्या कार्याचा भाग

            राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख कार्यांपैकी कायद्यांचा आढावा घेणे हे महत्त्वाचे कार्य आहे. यावर्षी आयोगाने ‘ पोश ऍक्ट’चा आढावा घेताना देशाच्या विविध भागांत सल्लामसलती आयोजित करून तज्ज्ञांची मते जाणून घेतली. त्याच धर्तीवर देशातील विविध राज्यांमधील महिलांशी संबंधित राज्य-विशिष्ट कायद्यांचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, असे विजया रहाटकर यांनी सांगितले.

            कायद्यांमध्ये काही पोकळी आहे का, कायदेशीर पळवाटा आहेत का, अंमलबजावणीमध्ये कोणत्या अडचणी येतात आणि विविध शासकीय यंत्रणांमध्ये आवश्यक समन्वय आहे का, याचा सखोल विचार या सल्लामसलतीतून होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

            या सल्लामसलतीतून प्राप्त होणाऱ्या शिफारशींचे दस्तऐवजीकरण करून त्या महाराष्ट्र शासन तसेच केंद्र शासनाकडे सादर करण्यात येतील. या शिफारशींचा उपयोग नवीन कायदे तयार करणे, विद्यमान कायद्यांमध्ये सुधारणा करणे, मार्गदर्शक सूचना व धोरणे तयार करण्यासाठी होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

-विशिष्ट कायद्यांच्या आढाव्यातून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस शिफारशी आवश्यक

 राज्य-विशिष्ट कायद्यांच्या आढाव्यातून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस शिफारशी आवश्यक


-राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर


· महिलांच्या मालमत्ता, कृषी जमीन हक्कांसह ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर टीस येथे विचारमंथन


 


            मुंबई, दि. 5 : कायद्याने महिलांना दिलेले अधिकार आणि प्रत्यक्षात त्यांना मिळणारा न्याय यातील दरी दूर करण्यासाठी राज्य-विशिष्ट कायद्यांचा सखोल आढावा घेऊन व्यावहारिक आणि कृतिशील शिफारशी तयार करणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले.


            राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस), मुंबईच्या स्कूल ऑफ लॉ, राइट्स अँड कॉन्स्टिट्यूशनल गव्हर्नन्स (एस.एल.आर.सी.जी.) यांच्या संयुक्त विद्यमाने टीस येथील एस. परशुराम सभागृहात ‘राज्य-विशिष्ट कायद्यांच्या आढाव्याबाबत विचारमंथन’ आयोजित करण्यात आले. यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.


            यावेळी महिलांचे वारसा व मालमत्ता हक्क, कृषी जमिनीवरील महिलांची मालकी, शेतकरी आत्महत्यांनंतर कुटुंबातील महिलांची परिस्थिती, कार्यस्थळावरील सुरक्षितता, न्यायप्रवेश तसेच ज्येष्ठ नागरिकांचे हक्क आणि त्यांच्या संरक्षणाशी संबंधित विविध कायद्यांवर चर्चा करण्यात आली.

राज्य शासनाने नागरिकांसाठी सुमारे ११०० सेवा ऑनलाइन

 राज्य शासनाने नागरिकांसाठी सुमारे ११०० सेवा ऑनलाइन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या सेवांचे विश्लेषण केल्यानंतर त्यातील सुमारे २०० सेवांचा नागरिकांकडून प्रत्यक्ष वापरच होत नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर वापरत असलेल्या सुमारे ४५ ते ४७ सेवा आणि योजनांच्या वितरण प्रक्रियेत सुधारणा केल्यास ९० टक्के नागरिकांना अधिक वेगवान आणि चांगली सेवा देता येईल, असे निर्दशनास आले. या प्रक्रियेचे पुनर्रचनाकरण अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईतील कुपोषणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज

 मुंबईतील कुपोषणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज


मुंबई महापालिकेने पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठे काम केले आहे. त्याचबरोबर शिक्षण, आरोग्य आणि पोषण या क्षेत्रांतही अधिक परिणामकारक हस्तक्षेप करण्याची गरज आहे. शहरातील काही भागांत कुपोषण, बालकांमधील खुंटलेली वाढ आणि कृशता या सारख्या समस्या अद्याप दिसून येतात. विशेषतः झोपडपट्ट्या आणि गरीब वस्त्यांमधील मुलांपर्यंत पोषण पोहोचविण्यासाठी सीएसआर भागीदारीचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे. पोषणाचा थेट संबंध मुलांच्या मेंदूच्या विकासाशी, शिक्षणातील कामगिरीशी आणि रोगप्रतिकारक क्षमतेशी आहे. त्यामुळे पोषणाच्या क्षेत्रात प्रभावी हस्तक्षेप केल्यास पुढील पिढीच्या विकासावर त्याचा दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

सीएसआरमध्ये पैसा नव्हे, परिणाम महत्त्वाचा’

 सीएसआरमध्ये पैसा नव्हे, परिणाम महत्त्वाचा’


कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वासाठी (सीएसआर) किती निधी खर्च झाला, यापेक्षा त्यातून किती लोककल्याण झाले आणि कोणता परिणाम साधला, हे अधिक महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

सीएसआरच्या माध्यमातून काम करणाऱ्या संस्थांकडून शासनाला नवीन तंत्रज्ञान, आधुनिक व्यवस्थापन पद्धती, प्रभावी निरीक्षण व्यवस्था आणि लवचिक कार्यपद्धती मिळते. शासनाच्या पारंपरिक प्रशासकीय प्रक्रियांमध्ये काही मर्यादा असतात. त्यामुळे सरकारी यंत्रणा आणि सीएसआर भागीदार यांची सांगड घातल्यास अधिक परिणामकारक काम होऊ शकते, असेही त्यांनी सांगितले.

पार्टिसिपेट मुंबई’ हा सहभागाचा मंच

 पार्टिसिपेट मुंबई’ हा सहभागाचा मंच

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘पार्टिसिपेट मुंबई’ हा केवळ कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधी उपलब्ध करून देणारा मंच नसून ‘तुम्ही आणि आम्ही एकत्र येऊन समाजातील शेवटच्या घटकासाठी काय करू शकतो’ यासाठीचा सहभागाचा मंच आहे. महापालिकेला ज्या क्षेत्रात भागीदारीची आवश्यकता आहे, अशा विविध प्रकल्पांची माहिती या मंचावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी, रोजगार, पर्यावरण, उद्याने, सौंदर्यीकरण, गरिबी निर्मूलन यांसारख्या क्षेत्रांमध्ये काम करू इच्छिणाऱ्या कंपन्या, स्वयंसेवी संस्था किंवा नागरिकांना त्यांच्या आवडीच्या प्रकल्पाची निवड करता येणार आहे.

 

एखाद्या संस्थेला विशिष्ट क्षेत्रात काम करायचे असल्यास त्यांची स्वतःची योजना देखील या मंचावर मांडता येणार आहे. त्यामुळे महापालिका आणि सामाजिक तसेच कॉर्पोरेट क्षेत्र यांच्यातील दरी कमी होऊन विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

Featured post

Lakshvedhi