Thursday, 13 August 2026

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी थेट संवाद

 उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी  थेट संवाद

·         विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण सूचनांचे केले स्वागत

 

मुंबई, दि. १२ : उच्च शिक्षणाच्या विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी अशा विविध विषयांवर विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी थेट संवाद साधला 

 

मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी  विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. या संवादातून विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासह युवकांचा धोरणनिर्मिती प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी विविध अभ्यासपूर्ण सूचना मांडल्या.

 

विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजना, अनुदाने व सवलती यांची माहिती अधिक व्यापकपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली. धोरणे जाहीर झाल्यानंतर त्यांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहचवण्यासंदर्भात विश्वास, पारदर्शकता आणि प्रभावी संवाद निर्माण होणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी नवीन कायदे, निर्णय किंवा शैक्षणिक धोरणांबाबत युवकांची मते जाणून घेण्यासाठी ओपिनियन पोलकिंवा डिजिटल अभिप्राय यंत्रणा विकसित करण्याची सूचनाही केली. शासनाच्या विविध पोर्टलवर विद्यार्थ्यांना आपली मते नोंदविता येतील, अशी अधिक सुलभ व्यवस्था असावी, असे मत चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आले.


सायबर सुरक्षा ही भू-राजकीय सुरक्षेचा भाग

 सायबर सुरक्षा ही भू-राजकीय सुरक्षेचा भाग - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

सायबर सुरक्षा ही आता केवळ तंत्रज्ञानाशी संबंधित बाब राहिलेली नसून भू-राजकीय सुरक्षेचा महत्त्वाचा भाग बनली आहे, असे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी सांगितले. ऑपरेशन सिंदूरतसेच इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनचा संदर्भ देताना आधुनिक संघर्षांमध्ये प्रत्यक्ष युद्धभूमीबरोबरच सायबर क्षेत्रातही हल्ले होत असल्याचे त्यांनी सांगितले.

 

चुकीची माहिती, दिशाभूल करणारी माहिती, डिजिटल मालमत्तांमध्ये घुसखोरी तसेच महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील सायबर हल्ले ही वाढती आव्हाने आहेत. वीज, बँकिंग, वित्तीय तंत्रज्ञान, वाहतूक, विमान वाहतूक आणि अंतराळ क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये खासगी क्षेत्राची भूमिका वाढत असल्याने त्यांच्या सायबर सुरक्षेची जबाबदारी शासनासोबत उद्योग क्षेत्राचीही आहे, असे ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

 

भारताने उभारलेल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचे संरक्षण अत्यंत महत्वाचे आहे. आधार, जनधन खाती, थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल देयक प्रणालीच्या माध्यमातून अब्जावधी नागरिक डिजिटल सेवांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील डिजिटल व्यवहारांचे संरक्षण करण्यासाठी अत्याधुनिक सायबर सुरक्षा व्यवस्था आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

सायबर गुन्ह्यांचे औद्योगिकीकरण आणि फ्रॉड-अ‍ॅज-अ-सर्व्हिसही गंभीर आव्हाने बनली आहेत. अनेक फसवणुकीच्या घटनांमध्ये तांत्रिक सुरक्षा भेदण्याऐवजी नागरिकांकडून ओटीपी सांगणे, अनोळखी दुव्यावर क्लिक करणे किंवा अज्ञात एपीकेस्थापित करणे यामुळे फसवणूक होते. त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबतच डिजिटल ओळख आणि व्यवहार सुरक्षेलाही प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

भारत-इस्रायल सहकार्याला नवी दिशा

 भारत-इस्रायल सहकार्याला नवी दिशा

भारत आणि इस्रायलमधील सायबर सुरक्षा सहकार्य केवळ व्यावसायिक व्यवहारांपुरते मर्यादित न राहता दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. इस्रायली तंत्रज्ञान कंपन्या, भारतीय उद्योग, संशोधन संस्था आणि तज्ज्ञ यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन आणि तंत्रज्ञानाचा सहविकास करण्यासाठी अधिक संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

 

इस्रायली कंपन्यांनी भारताकडे केवळ बाजारपेठ म्हणून न पाहता तंत्रज्ञानाच्या सहविकासाचे केंद्र म्हणून पाहावे. भारताची व्यापक बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांची व्याप्ती यांचा लाभ घेत दोन्ही देशांनी सुरक्षित आणि विश्वासार्ह डिजिटल परिसंस्था उभारावी, असे ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता, भारत-इस्रायलमधील सायबर सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्याचे आवाहन Pl share

  

मुंबईची सायबर सुरक्षितता राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेची प्राथमिकता

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

·         भारत-इस्रायलमधील सायबर सुरक्षा सहकार्य अधिक दृढ करण्याचे आवाहन

 

मुंबई, दि. १२ : मुंबईची सायबर सुरक्षितता ही केवळ माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित बाब राहिलेली नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेची महत्त्वपूर्ण प्राथमिकता बनली आहे. सुरक्षित मुंबई म्हणजे सुरक्षित भारत आणि सुरक्षित भारतीय अर्थव्यवस्था होय. त्यामुळे सायबर सुरक्षेसाठी शासन, उद्योग, तंत्रज्ञ, अभियंते, संशोधन संस्था आणि तज्ज्ञांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.

 

मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशन सभागृहात भारत-इस्रायल सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ, नवोन्मेषक आणि उद्योग प्रतिनिधींच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी इस्रायलच्या आर्थिक व वाणिज्यिक मिशनचे वाणिज्यदूत तथा मिशन प्रमुख योवेग मेउशार, माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, इस्रायलच्या आर्थिक व वाणिज्यिक मिशनच्या एचएलएस व सायबर विभागाचे संचालक वृषभ घोडमारे आणि इस्रायलचे सायबर सुरक्षा व जोखीम व्यवस्थापन तज्ज्ञ चेन गिराट उपस्थित होते.

 

मुंबई हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र असून भांडवली बाजार, वित्तीय सेवा आणि उद्योग क्षेत्रात शहराचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ, राष्ट्रीय शेअर बाजार आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज यांसारख्या प्रमुख वित्तीय संस्थांची मुख्यालये मुंबईत आहेत. त्यामुळे मुंबईतील डिजिटल पायाभूत सुविधांवरील सायबर हल्ल्याचा परिणाम व्यापक आर्थिक व्यवस्थेवर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मुंबईची सायबर लवचिकता ही राष्ट्रीय आर्थिक सुरक्षेचा अविभाज्य भाग असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले.

 

कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम संगणन आणि मोठ्या प्रमाणावरील माहितीचे विश्लेषण यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा स्वीकार ही काळाची गरज आहे. मात्र, डिजिटल परिवर्तनासोबत डिजिटल सुरक्षिततेलाही प्राधान्य देणे आवश्यक आहे. तंत्रज्ञान विकसित करतानाच सुरक्षिततेचा विचार सुरुवातीपासून अंतर्भूत करून सक्षम आणि सायबर हल्ल्यांना तोंड देणारी डिजिटल परिसंस्था उभारण्यावर महाराष्ट्र शासनाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांगत्वापेक्षा व्यक्ती म्हणून पाहण्याची गरज

 दिव्यांगत्वापेक्षा व्यक्ती म्हणून पाहण्याची गरज

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिव्यांग व्यक्तींकडे पाहताना त्यांच्या दिव्यांगत्वापेक्षा त्यांच्याकडे सर्वप्रथम व्यक्ती म्हणून पाहण्याची गरज व्यक्त केली. पालक, शिक्षक आणि समाजाने मुलाकडे प्रथम एक मूल म्हणून पाहावे आणि त्यानंतर त्याच्या दिव्यांगत्वाचा विचार करावा. दिव्यांगत्व ही व्यक्तिमत्त्वाची केवळ एक बाजू असून ती त्या व्यक्तीची संपूर्ण ओळख नसल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांगजन विषयक विभागाच्या नावातील बदलही याच दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. ‘Department of Disability Affairs’ ऐवजी ‘Department of Empowerment of Persons with Disabilities’ असे नामकरण करून दिव्यांगत्वापेक्षा व्यक्तीच्या सक्षमीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे.

Wednesday, 12 August 2026

एसटी’च्या जागांवर उभ्या राहणाऱ्या स्थानकांच्या इमारती ‘आयकॉनिक’ असाव्यात

 एसटी’च्या जागांवर उभ्या राहणाऱ्या स्थानकांच्या इमारती आयकॉनिकअसाव्यात

-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

·         १४७ बसस्थानकांच्या पुनर्विकासातून एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न

 

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानके आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिकआणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात तसेच नागरिकांना सुविधा देखील मिळाव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

 

एसटीच्या जागा पीपीपी तत्त्वावर विकसित करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सविस्तर आढावा घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते.

 

 प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करावा, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.यावेळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी सादरीकरण केले.

 

एसटी महामंडळ दररोज सुमारे ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करते. महामंडळाच्या ताफ्यात १५,५०० हून अधिक बसेस असून राज्यभर बसस्थानके आणि आगारांचे मोठे जाळे आहे. मात्र, अनेक बसस्थानकांच्या इमारती ४० वर्षांहून अधिक जुन्या असून कालबाह्य पायाभूत सुविधांमुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र एसटी महामंडळ २.०अंतर्गत आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित बसस्थानकांच्या विकासावर भर देण्यात येत आहे असेउपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

युवाशक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल

 युवाशक्तीच्या सामर्थ्यावर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडेल

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य तिरंगा रॅलीला उपस्थित

पुणे, दि. ११ : युवाशक्तीच्या सामर्थ्यावर उद्याचा विकसित भारत आणि सर्वांची स्वप्न पूर्ण करणारा, समतेचा, प्रगतीचा, युवांच्या स्वप्नांना बळ देणारा विकसित महाराष्ट्र घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला

'हर घर तिरंगा अभियान' अंतर्गत नामदार गोपाळकृष्ण गोखले मार्गावर आयोजित भव्य तिरंगा रॅलीला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापौर मंजुषा नागपुरे, आमदार रवींद्र चव्हाण, उमा खापरे, अमित गोरखे, सिद्धार्थ शिरोळे, राहुल कुल, शंकर जगताप आदी उपस्थित होत

‘इस तिरंगे को हम कभी झुकने नहीं देंगे’ हे सांगण्यासाठी तरुणाई आज तिरंगा हाती घेऊन रस्त्यावर आल्याचे सांगून देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या संदेशानुसार १५ ऑगस्टपर्यंत देशाच्या प्रत्येक शहरात, गावात आपली राष्ट्रभक्ती प्रगट करण्याकरता तिरंगा झेंडा हातामध्ये घ्यावा आणि तिरंग्याची शान दाखवून द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, तिरंगा हा केवळ झेंडा नसून देशभक्तीचे प्रतीक आहे. तिरंगा आपल्या मनात आणि जीवनात आहे. तिरंगा हाती घेतला तर आपल्याला केवळ आपले अधिकार नाही तर कर्तव्य देखील लक्षात ठेवावे लागतात. ज्या संविधानाने अधिकार दिले त्याच संविधानाने आपल्यावर काही कर्तव्ये पार पाडण्याची जबाबदारीदेखील टाकली आहेत. त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही ते म्हणाले

प्रधानमंत्री मोदींनी पाहिलेले विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकसित महाराष्ट्र उभा करायचा आहे. पुणे महाराष्ट्राची विद्यानगरी, महाराष्ट्राची नवोन्मेषाची नगरी तसेच महाराष्ट्राची उद्योग नगरी आहे. पुण्यनगरी भारताचं एक सांस्कृतिक बलस्थान आहे. या पुण्याच्या युवाशक्तीच्या भरोशावर उद्याचा भारत आपण पाहणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

तिरंग्याच्या सन्मानासाठी अनेकांनी आपले प्राण दिले, तिरंगा आणि देशासाठी अनेक सैनिक प्राण देतात. हा तिरंगा हाती घेतल्यावर आपल्यावर देशसेवेची जबाबदारी आहे, याचे स्मरण मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना करून दिले.

ललित चौक येथून रॅलीला प्रारंभ झाला आणि फर्ग्युसन महाविद्यालय मार्गाने पुढे जात छत्रपती संभाजी महाराज चौकात रालीचा समारोप झाला. यावेळी दुतर्फा उभे राहून नागरिक, विद्यार्थी वंदे मातरम्, भारत माता की जय आदी घोषणा दिल्या.

रॅलीत लोकप्रतिनिधी, नागरिक, महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या

 संख्येने उपस्थित होते.


Featured post

Lakshvedhi