सायबर सुरक्षा ही भू-राजकीय सुरक्षेचा भाग - प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
सायबर सुरक्षा ही आता केवळ तंत्रज्ञानाशी संबंधित बाब राहिलेली नसून भू-राजकीय सुरक्षेचा महत्त्वाचा भाग बनली आहे, असे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’ तसेच इस्रायलच्या ‘ऑपरेशन रायझिंग लायन’चा संदर्भ देताना आधुनिक संघर्षांमध्ये प्रत्यक्ष युद्धभूमीबरोबरच सायबर क्षेत्रातही हल्ले होत असल्याचे त्यांनी सांगितले.
चुकीची माहिती, दिशाभूल करणारी माहिती, डिजिटल मालमत्तांमध्ये घुसखोरी तसेच महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरील सायबर हल्ले ही वाढती आव्हाने आहेत. वीज, बँकिंग, वित्तीय तंत्रज्ञान, वाहतूक, विमान वाहतूक आणि अंतराळ क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये खासगी क्षेत्राची भूमिका वाढत असल्याने त्यांच्या सायबर सुरक्षेची जबाबदारी शासनासोबत उद्योग क्षेत्राचीही आहे, असे ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.
भारताने उभारलेल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचे संरक्षण अत्यंत महत्वाचे आहे. आधार, जनधन खाती, थेट लाभ हस्तांतरण आणि डिजिटल देयक प्रणालीच्या माध्यमातून अब्जावधी नागरिक डिजिटल सेवांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातील डिजिटल व्यवहारांचे संरक्षण करण्यासाठी अत्याधुनिक सायबर सुरक्षा व्यवस्था आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सायबर गुन्ह्यांचे औद्योगिकीकरण आणि ‘फ्रॉड-अॅज-अ-सर्व्हिस’ ही गंभीर आव्हाने बनली आहेत. अनेक फसवणुकीच्या घटनांमध्ये तांत्रिक सुरक्षा भेदण्याऐवजी नागरिकांकडून ओटीपी सांगणे, अनोळखी दुव्यावर क्लिक करणे किंवा अज्ञात ‘एपीके’ स्थापित करणे यामुळे फसवणूक होते. त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबतच डिजिटल ओळख आणि व्यवहार सुरक्षेलाही प्राधान्य देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली
No comments:
Post a Comment