Wednesday, 12 August 2026

एसटी’च्या जागांवर उभ्या राहणाऱ्या स्थानकांच्या इमारती ‘आयकॉनिक’ असाव्यात

 एसटी’च्या जागांवर उभ्या राहणाऱ्या स्थानकांच्या इमारती आयकॉनिकअसाव्यात

-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

·         १४७ बसस्थानकांच्या पुनर्विकासातून एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न

 

मुंबई, दि. ११ : महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बसस्थानके आणि इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिकआणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात तसेच नागरिकांना सुविधा देखील मिळाव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

 

एसटीच्या जागा पीपीपी तत्त्वावर विकसित करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सविस्तर आढावा घेतला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यावेळी उपस्थित होते.

 

 प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करावा, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.यावेळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी सादरीकरण केले.

 

एसटी महामंडळ दररोज सुमारे ५५ लाख प्रवाशांची वाहतूक करते. महामंडळाच्या ताफ्यात १५,५०० हून अधिक बसेस असून राज्यभर बसस्थानके आणि आगारांचे मोठे जाळे आहे. मात्र, अनेक बसस्थानकांच्या इमारती ४० वर्षांहून अधिक जुन्या असून कालबाह्य पायाभूत सुविधांमुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र एसटी महामंडळ २.०अंतर्गत आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी-केंद्रित बसस्थानकांच्या विकासावर भर देण्यात येत आहे असेउपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi