विद्यापीठांमध्ये विद्यार्थी मराठी साहित्य संमेलन आयोजित करा
-उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील
· १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमध्ये एकदिवसीय संमेलन
मुंबई, दि. २२ : शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अभिमत विद्यापीठांमध्ये एकदिवसीय विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने आयोजित करावीत, अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. या संमेलनांमध्ये युवा विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग राहील, यासाठी विद्यापीठांनी विशेष नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसंदर्भात राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत ऑनलाइन बैठक उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनातून घेण्यात आली. यावेळी मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत उपस्थित होते. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव अमोल मुत्याल, मराठी भाषा विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे येथे २८ जानेवारी २०२७ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. या संमेलनाचे औचित्य साधून राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून मराठी भाषेचा प्रसार आणि साहित्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये अधिक रुची निर्माण होण्यास मदत होईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
सर्व विद्यापीठांनी ही संमेलने एकाच दिवशी न घेता वेगवेगळ्या तारखांना आयोजित करावीत, जेणेकरून विविध ठिकाणी होणाऱ्या साहित्यविषयक उपक्रमांना व्यापक स्वरूप प्राप्त होईल, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या.