चारा उपलब्धतेसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करा
जालना जिल्ह्यातील पशुधनाची संख्या, उपलब्ध चारा आणि संभाव्य तूट यांचा समावेश असलेला स्वतंत्र चारा कृती आराखडा तयार करावा. चारा डेपो अथवा चारा छावण्यांची आवश्यकता, जिल्ह्याची चारा स्वयंपूर्णता आणि अतिरिक्त चारा मिळविण्याचे स्रोत निश्चित करावेत. शेजारील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून तेथील चारा उपलब्धतेचा अभ्यास करावा, असेही त्यांनी निर्देशित केले.
पाणी उपलब्ध असलेल्या भागांतील शेतकऱ्यांना चारा पिकांच्या लागवडीसाठी प्रोत्साहित करावे. गाळपेरा क्षेत्रांचा चारा उत्पादनासाठी उपयोग करण्याची व्यवहार्यता तपासून त्याबाबतचा निर्णय प्रस्ताव तयार करावा. चारा छावण्या अथवा अन्य उपायांसाठी राज्यस्तरीय निर्णय आणि निधीची आवश्यकता असल्यास शासनाकडे तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले.
पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी आणि चारा या विषयांवर केंद्रित स्वतंत्र बैठक २८ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. या बैठकीसाठी जलस्रोतांचे लेखापरीक्षण, चारा नियोजन, संभाव्य पाणीटंचाईची गावे आणि आवश्यक उपाययोजनांची सविस्तर माहिती तयार ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री मुंडे यांनी दिले.