Tuesday, 22 September 2026

२५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट · मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता

 २५ सप्टेंबरपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट

·         मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता

 

मुंबई, दि. २१ : मुंबई वेधशाळेने पुढील चार दिवसांसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

 

२२ सप्टेंबर : नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, ठाणे, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.

 

२३ सप्टेंबर : नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, रायगड, पुणे घाट, पुणे, सातारा, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.

 

२४ सप्टेंबर : सातारा, सातारा घाट, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट, लातूर, नांदेड, जालना, परभणी, वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.

 

२५ सप्टेंबर : वाशिम, बुलढाणा, अकोला, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली.

 

यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होत असताना आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे

नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओंकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी (नाशिक) यांना 'कै. डॉ. एस. एस. गडकरी स्मृती पुरस्कार'

 नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी ओंकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी (नाशिक) यांना 'कै. डॉ. एस. एस. गडकरी स्मृती पुरस्कार'

 

            विधवा, परित्यक्ता महिला तसेच कुपोषित बालकांच्या कल्याणासाठी जिल्हास्तरावर नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ओंकार पवार यांनी राबविलेल्या दोन नाविन्यपूर्ण प्रशासकीय उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महाराष्ट्रातील एकल महिला, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिला तसेच प्रौढ अविवाहित महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरावर ‘नवचेतना अभियान’ राबविण्यात येत असून, हे पहिले व्यापक पुनर्वसन अभियान आहे.

 

            ‘पोषण दूत योजने’अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावरील प्रत्येक वर्ग-१ व वर्ग-२ अधिकाऱ्याने एका तीव्र कुपोषित बालकाची वैयक्तिकरित्या जबाबदारी स्वीकारणे अपेक्षित आहे. संबंधित अधिकारी दरमहा बालकाची भेट घेऊन त्याचे वजन तपासणे, आवश्यक औषधोपचार व इतर सुविधा मिळत असल्याची खात्री करणे, तसेच येणाऱ्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्याचे काम करतात.


Monday, 21 September 2026

महिला व बालकांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग, महिलांना विविध लघुउद्योग सुरू करण्यासाठी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

 

महिला व बालकांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभाग, महिलांना विविध लघुउद्योग सुरू करण्यासाठी उद्योग विभाग, शेतकरी महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी कृषी विभाग, सामाजिक न्याय विभाग, कौशल्य व रोजगार विभाग तसेच सुरक्षेसाठी गृह विभाग यांच्या समन्वयाने महिला व बालविकास विभाग विविध योजना राबवित आहे.

 

ग्रामीण भागासह शहरातील महिलांनाही उद्योग सुरू करता यावेत यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यरत आहे. महिलांना कायदेशीर सहाय्य व सुरक्षेसाठी राज्य महिला आयोग, बालकांच्या हक्क व सुरक्षेसाठी राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, तसेच बालक व मातांच्या आरोग्यासह शिक्षणासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येत आहे. तसेच पोषण माहच्या माध्यमातून शहरासह

 महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी  ‘लेक लाडकी’ योजना राबविण्यात येत आहे. तसेच पोषण माहच्या माध्यमातून शहरासह राज्यातील पालकांमध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. अनाथ बालकांसाठी बालकाश्रम, काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे, तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना गुणवत्तेच्या आधारे मुंबई व उपनगरातील वसतिगृहांमध्ये प्रवेशाची सुविधा उपलब्ध आहे. महिला व बालकांच्या सुरक्षेसह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत.

 

पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य द्या

 पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य द्या

– जालना पालकमंत्री पंकजा मुंडे

·         जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई व चारा उपलब्धतेचा दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा

·         जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांचे लेखापरीक्षण करण्याचे निर्देश

·         चारा उपलब्धतेसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करा

 

            मुंबई, दि. २१ : जालना जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य वापराचे तातडीने लेखापरीक्षण करून पुढील ऑगस्टपर्यंतचा पाणीपुरवठा आराखडा तयार करावा. नागरिकांसह पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

 

            पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि चारा उपलब्धतेचा आढावा घेतला. 

 

जालना जिल्ह्यातील धरणे, तलाव, विहिरी, लघुपाटबंधारे आणि अन्य नैसर्गिक जलस्रोतांतील पाणीसाठ्याचे लेखापरीक्षण पुढील बैठकीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना दिले. जायकवाडी प्रकल्पातून होणाऱ्या उचल पाणीपुरवठ्याची स्थिती आणि अंबड व जालना शहरांना उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा कालावधी यांचा अचूक अंदाज घ्यावा. सध्याचा पाणीसाठा मार्चपर्यंत पुरण्याची शक्यता असली, तरी पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी उपलब्ध न झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करून पर्यायी नियोजन करावे, असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

युवक युवतींना भाषा प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार परदेशातील रोजगार संधी pl share

 युवक युवतींना भाषा प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

            महाराष्ट्रातील युवक –युवतींना परदेशातील रोजगार संधी सुलभ व्हाव्यात आणि भाषिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी केंद्र शासनाचा डिजिटल इंडिया भाषिणी, मित्रा आणि महिमा  यांच्यात सामंजस्य करार झाला. भाषांतर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उमेदवारांना परदेशी आणि व्यवसायनिहाय भाषांचे मोफत व सुलभ प्रशिक्षण मिळणार असून, या प्रायोगिक प्रकल्पाचा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांना लाभ होईल.

            राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलता ही केवळ मनुष्यबळाच्या स्थलांतराची प्रक्रिया नसून कौशल्य, गुंतवणूक, प्रवासी भारतीय समुदाय आणि जागतिक बाजारपेठेला जोडणारी आर्थिक भागीदारी आहे. मुंबईतील परदेशी वाणिज्य दूतावासांचे नेटवर्क, उद्योग, विद्यापीठे आणि कौशल्य विकास संस्थांचा समन्वय साधून महाराष्ट्रातील प्रतिभेला जागतिक संधींशी जोडण्यात येईल.

देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर; महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशिलता धोरण २०२६ जाहीर

 देशनिहाय स्किल पासपोर्ट, अद्ययावत प्रशिक्षण आणि सुरक्षित भरती

प्रक्रियेवर राज्य शासनाचा भर;

महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशिलता धोरण २०२६ जाहीर

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. २१ : जागतिक रोजगाराच्या बदलत्या गरजांनुसार महाराष्ट्रातील युवक-युवतींना कौशल्य आणि भाषा प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी सक्षम करण्यात येत आहे. विविध देशांची कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून देशनिहाय ‘स्किल पासपोर्ट’ तयार करावा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अन्य प्रशिक्षण संस्थांनी अभ्यासक्रम अद्ययावत करावा. तसेच महाराष्ट्रासाठी जागतिक कार्यबल गतीशिलता धोरणातंर्गत परदेशातील रोजगारासाठी सुरक्षित भरती व्यवस्था विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित आंतरराष्ट्रीय कामगार गतिशीलतेवरील एकदिवसीय उच्चस्तरीय परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा), राजशिष्टाचार विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महाराष्ट्र एजन्सी फॉर होलिस्टिक इंटरनॅशनल मोबिलिटी अँड ॲडव्हान्समेंट (महिमा) यांनी संयुक्तपणे या परिषदेचे आयोजन केले होते.

            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जागतिक स्तरावरील बदलती लोकसंख्या आणि वाढते वृद्धत्व यामुळे कुशल मनुष्यबळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतातील युवा मनुष्यबळाची क्षमता लक्षात घेऊन जागतिक मागणीशी कुशल मनुष्यबळाची प्रभावी सांगड घालावी लागेल. त्यातून ‘सर्क्युलर मोबिलिटी ऑफ टॅलेंट’ ही संकल्पना अधिक सक्षम होईल आणि महाराष्ट्र या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल.

Featured post

Lakshvedhi