पिण्याचे पाणी, पशुधनासाठी पाणी व चारा नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य द्या
– जालना पालकमंत्री पंकजा मुंडे
· जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई व चारा उपलब्धतेचा दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा
· जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांचे लेखापरीक्षण करण्याचे निर्देश
· चारा उपलब्धतेसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करा
मुंबई, दि. २१ : जालना जिल्ह्यातील सर्व जलस्रोतांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य वापराचे तातडीने लेखापरीक्षण करून पुढील ऑगस्टपर्यंतचा पाणीपुरवठा आराखडा तयार करावा. नागरिकांसह पशुधनासाठी पाणी आणि चाऱ्याची उपलब्धता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना जिल्ह्यातील पाणीटंचाई आणि चारा उपलब्धतेचा आढावा घेतला.
जालना जिल्ह्यातील धरणे, तलाव, विहिरी, लघुपाटबंधारे आणि अन्य नैसर्गिक जलस्रोतांतील पाणीसाठ्याचे लेखापरीक्षण पुढील बैठकीपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना दिले. जायकवाडी प्रकल्पातून होणाऱ्या उचल पाणीपुरवठ्याची स्थिती आणि अंबड व जालना शहरांना उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा कालावधी यांचा अचूक अंदाज घ्यावा. सध्याचा पाणीसाठा मार्चपर्यंत पुरण्याची शक्यता असली, तरी पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी उपलब्ध न झाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा विचार करून पर्यायी नियोजन करावे, असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment