Saturday, 19 September 2026

पुणे फेस्टिव्हलच्या 38 व्या पर्वाचे उद्घाटन · ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान

 पुणे फेस्टिव्हलच्या 38 व्या पर्वाचे उद्घाटन

·         ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी यांना जीवन गौरवपुरस्कार प्रदान

 

            पुणे, दि. 18  : परंपरा आणि आधुनिकता यांचा समन्वय साधत विकासाकडे वाटचाल करताना समृद्ध सांस्कृतिक वारसा, भाषा, कला, परंपरा आणि मूल्यांचे जतन करणे आवश्यक आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि आर्थिक विकासासोबत सांस्कृतिक मुळांशी नाते दृढ ठेवणे ही विकसित भारताची खरी ओळख आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

 

Friday, 18 September 2026

जर्मन तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता यांचा संगम घडविण्याची गरज

 भारत-जर्मनी भागीदारीत महाराष्ट्र केंद्रस्थानी

--राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

·         जर्मन उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादनासाठी आवाहन

 

            मुंबई, दि. १६ : भारत-जर्मनी आर्थिक संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी महाराष्ट्राला केंद्रस्थानी ठेवत जर्मन उद्योगांनी राज्यात गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन वाढवावे. महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजक आणि तरुणांशी भागीदारी करून महाराष्ट्रातून भारतासह संपूर्ण जगासाठी काम करण्याचे आवाहन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

 

            इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्या  ७०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राजशिष्टाचार मंत्री  रावल प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.  जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित या  कार्यक्रमाला जर्मनीचे भारत व भूतानमधील राजदूत डॉ. जास्पर विक, जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेलेना मेल्निकोव्ह, आय.जी सी.सी.च्या नवनिर्वाचित अध्यक्षा रिन्सी सूद, महासंचालक यान नोएदर तसेच उद्योग, व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

            भारत-जर्मनी संबंधांचा पुढील टप्पा अधिक व्यापक आणि धोरणात्मक स्वरूपाचा असल्याचे सांगून राजशिष्टाचार मंत्री  जयकुमार रावल म्हणाले की, इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सची ७० वर्षांची वाटचाल ही केवळ वर्धापनदिनाची बाब नसून विश्वास, सातत्य आणि भागीदारीची प्रदीर्घ परंपरा आहे. भारत-जर्मनी राजनैतिक संबंधांच्या ७० व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर या भागीदारीला भविष्यातील विकासाची नवी दिशा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

 

            भारत-जर्मनी भागीदारी ही केवळ व्यापार आणि गुंतवणुकीपुरती मर्यादित नसून लोकशाही, तंत्रज्ञान, नवोन्मेष, कौशल्य, संशोधन, शाश्वत विकास आणि परस्पर विश्वास या आधारस्तंभांवर उभी आहे. जर्मनीच्या अचूक अभियांत्रिकी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड भारताच्या व्यापक बाजारपेठ, मनुष्यबळ आणि मोठ्या प्रमाणावरील कार्यान्वयन क्षमतेशी घातल्यास या भागीदारीला नवी ताकद मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.

 

जर्मन तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता यांचा संगम घडविण्याची गरज

 

            जर्मनीकडे अचूक अभियांत्रिकी, स्वयंचलित यंत्रणा, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीकरणीय ऊर्जा आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचे मोठे सामर्थ्य आहे. महाराष्ट्राकडे मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, दळणवळण व्यवस्था आणि मजबूत औद्योगिक परिसंस्था आहे. या दोन्ही क्षमतांचा संगम घडवून जागतिक बाजारपेठेसाठी आवश्यक उत्पादने व तंत्रज्ञान महाराष्ट्रात विकसित करण्यावर भर देण्याची गरज आहे, असे राजशिष्टाचार मंत्री  रावल यांनी स्पष्ट केले.

 

            केवळ अधिकाधिक जर्मन कंपन्यांना महाराष्ट्रात आणणे हे उद्दिष्ट नसून, महाराष्ट्रात इंडो-जर्मन उद्योगांची पुढील पिढी निर्माण झाली पाहिजे. संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान विकास, उत्पादन आणि नवोन्मेषाला चालना देऊन दीर्घकालीन भागीदारी उभी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

पॉक्सो कायद्यांतर्गत ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन माहितीसाठी wcd_mumupanagar@gmail.com

 पॉक्सो कायद्यांतर्गत सपोर्ट पर्सननियुक्तीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. १६ : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) अधिनियमांतर्गत पीडित बालकांना न्यायप्रक्रियेदरम्यान आवश्यक सहाय्य व संरक्षण मिळावे, यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात सपोर्ट पर्सननियुक्त करण्यात येणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी १५ दिवसांच्या आत अर्ज सादर करावा, असे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शरद कुऱ्हाडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे.

 

            सामाजिक कार्य, समाजशास्त्र, मानसशास्त्र किंवा बालविकास विषयातील पदव्युत्तर पदवीधारक व्यक्ती या पदासाठी पात्र आहेत. तसेच बालशिक्षण व विकास किंवा बालसंरक्षण क्षेत्रातील किमान तीन वर्षांचा अनुभव असलेले पदवीधर आणि एमएस-सीआयटीअथवा संगणक ज्ञानाचे अन्य प्रमाणपत्र असलेले उमेदवारही अर्ज करू शकतात. बालहक्क किंवा बालसंरक्षण क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत संस्था, तसेच बालगृह अथवा निवारा गृहातील बालकांच्या देखरेखीशी संबंधित अधिकारीही सपोर्ट पर्सनम्हणून पात्र ठरू शकतात.

 

            पात्र उमेदवारांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मुंबई उपनगर यांचे कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा टप्पा, पहिला मजला, आर. सी. मार्ग, चेंबूर, मुंबई-७१ येथे अर्ज सादर करावा. अर्ज अथवा अधिक माहितीसाठी wcd_mumupanagar@gmail.com या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधता येईल.

 

            निवड झालेल्या सपोर्ट पर्सनची नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात येईल. त्यांना सोपविण्यात आलेली प्रकरणे, प्रत्यक्ष कामाचे दिवस तसेच रुग्णालय, बाल कल्याण समिती, पोलीस ठाणे, बालसंगोपन संस्था, पीडित बालकाचे कुटुंब, शैक्षणिक संस्था, न्यायालय, शासकीय विभाग आणि बँक आदी ठिकाणी दिलेल्या प्रत्यक्ष भेटींच्या प्रमाणात मानधन देण्यात येईल.

एनसीएमसी कार्डधारकांसाठी आता भीम ॲपद्वारे सहज टॉप अप करता येणार

 एनसीएमसी कार्डधारकांसाठी आता भीम ॲपद्वारे सहज टॉप अप करता येणार

 

 

            मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. एनसीएमसी कार्डधारकांना आता भीम ॲपच्या माध्यमातून आपल्या कार्डचे टॉप अप करता येणार आहे. त्यामुळे कार्डमध्ये शिल्लक रक्कम संपल्यानंतर पुन्हा रिचार्ज करण्यासाठी केंद्रावर जाण्याची आवश्यकता राहणार नसून, मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या कार्डमध्ये रक्कम जमा करता येणार आहे.

 

            एनसीएमसी कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांच्या एनसीएमसी कार्डची नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या सुविधेला अधिक गतिमान आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने १५ सप्टेंबर २०२६ पासून भीम ॲपद्वारे एनसीएमसी कार्ड टॉप अपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

            या सुविधेचा वापर करण्यासाठी एनसीएमसी कार्डच्या पाठीमागील क्यूआर कोड भीम ॲपच्या माध्यमातून स्कॅन करावा लागणार आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर उपलब्ध प्रक्रियेनुसार टॉप अप करता येईल. त्यामुळे प्रवाशांना एनसीएमसी कार्डमध्ये आवश्यकतेनुसार रक्कम तत्काळ जमा करण्याची सुविधा मिळणार आहे.

 

            एसटी महामंडळाच्या डिजिटल प्रवासी सेवांना अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी डिजिटल सुविधा, अधिक सुलभ आणि अधिक गतिमान प्रवासया उद्देशाला या सुविधेमुळे आणखी बळ मिळणार आहे.

 

            विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्डचा वापर अधिक सुलभ होणार आहे.

लोकसंवाद कार्यक्रमातून ‘पंडीत दीनदयाळ रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ रोजगार मेळाव्यांची माहिती · माहिती व जनसंपर्क विभागाचा लोकसंवाद – २०२६ अभियान

 लोकसंवाद कार्यक्रमातून ‘पंडीत दीनदयाळ रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’

रोजगार मेळाव्यांची माहिती

 

·         माहिती व जनसंपर्क विभागाचा लोकसंवाद – २०२६ अभियान

 

            मुंबई, दि. १८ : माहिती व जनसंपर्क विभागातर्फे लोक संवाद अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे.

 

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत  २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात १००० रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असून 'पंडीत दीनदयाळ रोजगार महाकुंभ महाराष्ट्र रोजगार मेळाव्यांची' माहिती या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना नुकतीच देण्यात आली. मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड जिल्ह्यातील विविध गणेश मंडळांमध्ये नागरिकांशी संवाद साधून त्या त्या जिल्ह्यातील रोजगाराच्या संधी आणि मेळाव्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

कुलाबा येथील श्री सेवा गणेश मंडळाचे अध्यक्ष सुरेश जैन, कुलाब्याचा युवराज गणेश मंडळाचे हरिश बलसाने, कुलाब्याचा सम्राट गणेश मंडळाचे अध्यक्ष भगवान शहा, फोर्ट येथील इच्छापूर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष रूपेश सुर्वे, खारघरचा राजा गणेश मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव चवरे यांच्यासह विविध मंडळांचे सदस्य आणि भक्तगण यावेळी उपस्थित होते. मुंबई शहर जिल्ह्याचे रोजगार मेळावा समन्वयक अजय कांबळे तसेच माहिती व जनसंपर्क विभागाच्या विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे, श्रद्धा मेश्राम आणि अश्विनी पुजारी यांनी नागरिकांशी संवाद साधून रोजगार मेळाव्यांविषयी माहिती दिली.

 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मुळे भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल

 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मुळे भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले असून आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्यास नवे दालन खुले झाले आहे. पूर्वी भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जावे लागत होते; आता जगातील नामांकित विद्यापीठे भारतात येत असून त्यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यूडब्ल्यूए, मुंबई कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शैक्षणिक वातावरणाबरोबरच देशातील प्रमुख वित्तीय संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, तंत्रज्ञान उद्योग, स्टार्टअप्स, संशोधक आणि उद्योजकांच्या परिसंस्थेशी थेट जोडले जाण्याची संधी मिळेल, असे त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा, क्रिटिकल मिनरल्स, स्वच्छ ऊर्जा, शाश्वत विकास आणि प्रगत उत्पादन तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन आणि शैक्षणिक सहकार्य वाढावे, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

 

मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल

 मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

 

            मुंबई, दि. १८ - मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (यूडब्ल्यूए) इंडिया, मुंबई कॅम्पसच्या उद्घाटनामुळे नवे बळ मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या संस्था, पायाभूत सुविधा आणि प्रतिभावान मनुष्यबळ यांच्या माध्यमातून भविष्यातील उद्योग व संशोधन परिसंस्था उभारण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

            मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यूडब्ल्यूए इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन झाले. यावेळी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर रॉजर कूक, यूडब्ल्यूएच्या चॅन्सलर डॉ. डायन स्मिथ-गँडर, कुलगुरू प्रा. अमित चकमा, विद्यापीठाचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.

 

            मुख्यमंत्री म्हणाले की, यूडब्ल्यूएसारख्या ऑस्ट्रेलियातील अग्रगण्य संशोधनाधिष्ठित विद्यापीठाने भारतातील आपला पहिला कॅम्पस मुंबईत स्थापन करण्याचा निर्णय घेतला, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठित ग्रुप ऑफ एटमधील भारतात कॅम्पस सुरू करणारे यूडब्ल्यूए हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. हा निर्णय आजच्या मुंबईची क्षमता आणि जागतिक स्तरावरील तिच्या वाढत्या महत्वाची साक्ष देणारा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी असली तरी पुढील पिढीसाठी ती जागतिक ज्ञान आणि नवोपक्रम केंद्र बनविण्याचे राज्य शासनाचे ध्येय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यासाठी मुंबईलगत विकसित होत असलेल्या मुंबई 3.0’ प्रकल्पात एज्युकेशन सिटी, मेडी-सिटी, इनोव्हेशन सिटी, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर इकोसिस्टम तसेच संशोधन व उद्योगविकासाची नवी केंद्रे उभारली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

Featured post

Lakshvedhi