भारत-जर्मनी भागीदारीत महाराष्ट्र केंद्रस्थानी
--राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल
· जर्मन उद्योगांना महाराष्ट्रात गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादनासाठी आवाहन
मुंबई, दि. १६ : भारत-जर्मनी आर्थिक संबंधांना नव्या उंचीवर नेण्यासाठी महाराष्ट्राला केंद्रस्थानी ठेवत जर्मन उद्योगांनी राज्यात गुंतवणूक, नवोन्मेष आणि उत्पादन वाढवावे. महाराष्ट्रातील शेतकरी, उद्योजक आणि तरुणांशी भागीदारी करून महाराष्ट्रातून भारतासह संपूर्ण जगासाठी काम करण्याचे आवाहन पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले.
इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्या ७०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राजशिष्टाचार मंत्री रावल प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित या कार्यक्रमाला जर्मनीचे भारत व भूतानमधील राजदूत डॉ. जास्पर विक, जर्मन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेलेना मेल्निकोव्ह, आय.जी सी.सी.च्या नवनिर्वाचित अध्यक्षा रिन्सी सूद, महासंचालक यान नोएदर तसेच उद्योग, व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
भारत-जर्मनी संबंधांचा पुढील टप्पा अधिक व्यापक आणि धोरणात्मक स्वरूपाचा असल्याचे सांगून राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सची ७० वर्षांची वाटचाल ही केवळ वर्धापनदिनाची बाब नसून विश्वास, सातत्य आणि भागीदारीची प्रदीर्घ परंपरा आहे. भारत-जर्मनी राजनैतिक संबंधांच्या ७० व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर या भागीदारीला भविष्यातील विकासाची नवी दिशा देण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
भारत-जर्मनी भागीदारी ही केवळ व्यापार आणि गुंतवणुकीपुरती मर्यादित नसून लोकशाही, तंत्रज्ञान, नवोन्मेष, कौशल्य, संशोधन, शाश्वत विकास आणि परस्पर विश्वास या आधारस्तंभांवर उभी आहे. जर्मनीच्या अचूक अभियांत्रिकी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड भारताच्या व्यापक बाजारपेठ, मनुष्यबळ आणि मोठ्या प्रमाणावरील कार्यान्वयन क्षमतेशी घातल्यास या भागीदारीला नवी ताकद मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.
जर्मन तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता यांचा संगम घडविण्याची गरज
जर्मनीकडे अचूक अभियांत्रिकी, स्वयंचलित यंत्रणा, रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवीकरणीय ऊर्जा आणि आधुनिक उत्पादन तंत्रज्ञानाचे मोठे सामर्थ्य आहे. महाराष्ट्राकडे मोठी बाजारपेठ, कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा, दळणवळण व्यवस्था आणि मजबूत औद्योगिक परिसंस्था आहे. या दोन्ही क्षमतांचा संगम घडवून जागतिक बाजारपेठेसाठी आवश्यक उत्पादने व तंत्रज्ञान महाराष्ट्रात विकसित करण्यावर भर देण्याची गरज आहे, असे राजशिष्टाचार मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.
केवळ अधिकाधिक जर्मन कंपन्यांना महाराष्ट्रात आणणे हे उद्दिष्ट नसून, महाराष्ट्रात इंडो-जर्मन उद्योगांची पुढील पिढी निर्माण झाली पाहिजे. संयुक्त संशोधन, तंत्रज्ञान विकास, उत्पादन आणि नवोन्मेषाला चालना देऊन दीर्घकालीन भागीदारी उभी करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment