Wednesday, 2 September 2026

सुट्या खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत

 सुट्या खाद्यतेल व्यावसायिकांना कायद्यानुरूप बदलांसाठी एक वर्षाची मुदत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

·         एफडीए आणि व्यापाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करणार

·         ग्रामीण भागातील नागरिक व व्यावसायिकांच्या गरजांचा विचार करून निर्णय

·         व्यवसाय संक्रमण अनुकूल करण्यासाठी शासन मदत करणार

 

मुंबई, दि. १ : राज्यातील सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांना विद्यमान कायद्यानुसार व्यवसाय पद्धतीत आवश्यक बदल करण्यासाठी एक वर्षाचा संक्रमण कालावधी देण्यात येणार आहे. या बदलांसाठी उपाययोजना व मार्गदर्शन सुचविण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि व्यापारी प्रतिनिधींची संयुक्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार या बदलांना सामोरे जाताना व्यावसायिकांना राज्य शासनाकडून मदत, सुविधा तसेच अनुदान अथवा सबसिडी उपलब्ध करून देण्यात येईल, असा दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुट्या खाद्यतेल विक्रेत्यांनी दिला.

 

मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सुट्टे खाद्यतेल व्यावसायिकांच्या बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे, महाराष्ट्र तौलिक महासंघाचे अध्यक्ष माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार शिरीष चौधरी, खाद्यतेल उत्पादक व विक्रेता संघटनांचे कार्याध्यक्ष गजानन शेलार, महासचिव डॉ. भूषण कर्डिले, महाराष्ट्र प्रांतिक महासभेचे पोपटराव गवळी, शंकर ठक्कर, भारत कसळेकर आदी उपस्थित होते.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुट्या खाद्यतेल विक्रीवरील कारवाईची अंमलबजावणी तूर्तास एक वर्षासाठी स्थगित ठेवण्यात येईल. मात्र, त्यानंतर मुदतवाढ देता येणार नाही आणि कायद्याचे पालन करावेच लागेल. त्यामुळे या एक वर्षाच्या कालावधीत प्रत्येक व्यावसायिकांना आपल्या व्यवसाय पद्धतीत कायद्यानुरूप आवश्यक बदल करावे लागतील, या कालावधीत कायद्याचे पालन करण्यासाठी पारंपरिक व्यावसायिकांना कोणते बदल करावे लागतील, याबाबत समिती उपाय सुचवेल.

 

ग्रामीण भागातही सुट्या खाद्यतेलाची मागणी आणि गरज आहे. त्याचबरोबर या व्यवसायावर अनेक व्यावसायिकांचा रोजगार अवलंबून आहे. त्यामुळे कायदा आणि सामान्य माणसाची गरज यामध्ये योग्य मार्ग काढणे आवश्यक आहे. सुट्या खाद्यतेलाचा वापर आणि विक्रीची पद्धत राज्यात अनेक वर्षांपासून पारंपरिक स्वरूपात सुरू आहे. त्यामुळे ही पद्धत बदलण्यासाठी व्यावसायिकांना काही कालावधी देणे आवश्यक आहे. कायदा आपले काम करतो; मात्र पारंपरिक व्यवसाय पद्धतीतून कायद्यानुरूप व्यवस्थेकडे जाण्यासाठी संक्रमण कालावधी आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या व्यवसायातील व्यावसायिक, खाद्यतेल विक्रेते, उत्पादक आणि पुर्नर्पाकिंग करणारे उद्योजक यांच्यासाठी कायद्यानुरूप बदल करण्याचे नियोजन समितीच्या माध्यमातून करण्यात येईल. गुणवत्ता तपासणी व्यवस्था, पॅकेजिंग सुविधा आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी व्यावसायिकांना मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

अमृताहुनी गोड’मधून ज्येष्ठ संगीत मान्यवरांचा सन्मान आणि स्वरसोहळा ७ सप्टेंबर रोजी विलेपार्ले येथे अमृत महोत्सवी संगीत कलाकारांच्या गौरवाचा विशेष कार्यक्रम

 अमृताहुनी गोडमधून ज्येष्ठ संगीत मान्यवरांचा सन्मान आणि स्वरसोहळा

७ सप्टेंबर रोजी विलेपार्ले येथे अमृत महोत्सवी संगीत कलाकारांच्या गौरवाचा विशेष कार्यक्रम

 

            मुंबई, दि. २  : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने सन २०२५-२६ मध्ये आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या अथवा ७५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांचा सन्मान तसेच त्यांनी गायलेल्या, स्वरबद्ध केलेल्या आणि संगीत संयोजन केलेल्या गीतांचा व नृत्याचा विशेष स्वरसोहळा अमृताहुनी गोडहा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

            सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे हा विशेष कार्यक्रम होणार आहे. संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करणे, त्यांच्या कलाकृतींचे स्मरण करणे आणि त्यांच्या सांगीतिक योगदानाचा नव्या पिढीशी परिचय करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

            या कार्यक्रमात श्रीधर फडके, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, भीमराव पांचाळे, अजित कडकडे, डॉ. मंजिरी देव आणि अप्पा वढावकर यांचा सन्मानार्थी व विशेष सहभागी म्हणून सहभाग असणार आहे. त्यांच्या कलाप्रवासाला उजाळा देत त्यांच्या गायन, स्वररचना आणि संगीताशी संबंधित निवडक कलाकृतींचे सादरीकरण या स्वरसोहळ्यात करण्यात येणार आहे.

            कार्यक्रमात मंदार आपटे, सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे, शार्दुल कवठेकर, प्राजक्ता सातर्डेकर आणि ओंकार प्रभूघाटे हे गायक कलाकार सादरीकरण करणार आहेत. विघ्नेश जोशी निवेदन करणार असून, सागर साठे संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच डॉ. मंजिरी देव यांच्या शिष्यांचे नृत्य सादरीकरण हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे.

            हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ व ज्येष्ठतम कलावंतांच्या योगदानाचा गौरव करणे, त्यांच्या कलासाधनेचा वारसा जतन करणे आणि तो रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

            या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. शिल्लक प्रवेशिका रविवार, ६ सप्टेंबर २०२६ पासून नाट्यगृहावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कार्यक्रमातील काही रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्येष्ठ संगीत मान्यवरांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या सांगीतिक योगदानाला समर्पित अमृताहुनी गोडया विशेष स्वरसोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक  प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला सर्वोच्च प्राधान्य

 शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला सर्वोच्च प्राधान्य

रेशीम कोषाचे उत्पादन वाढविणे हा एकमेव उद्देश नसून रेशीम शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे, असे मंत्री सावकारे यांनी स्पष्ट केले. कोषपूर्व, कोशोत्तर आणि मूल्यवर्धनाचे सर्व टप्पे एकत्रितपणे विकसित झाल्यास प्रत्येक टप्प्यावर रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होतील. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, बँका, रेशीम विभाग तसेच संबंधित शासकीय विभाग यांचा समन्वय साधण्यात येणार आहे. योजनांचा लाभ प्रत्येक रेशीम शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासोबतच महिला आणि युवकांसाठी गावातच वर्षभर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

 

गावातच रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यास ग्रामीण युवकांचे शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल. प्रगत रेशीम गावांना रोल मॉडेल रेशीम ग्रामम्हणून विकसित करून त्यांची यशोगाथा राज्यातील इतर गावांपर्यंत पोहोचविण्यात येईल. यातून महाराष्ट्रात रेशीम शेतीची नवी चळवळ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

 

रेशीम धागा हा केवळ वस्त्रनिर्मितीचा धागा नाही; तो शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामीण उद्योजकांच्या आर्थिक परिवर्तनाचा धागा आहे. याच धाग्याला विकासाचा धागा बनवत महाराष्ट्रात सॉईल टू सिल्क  – आत्मनिर्भर रेशीम ग्रामही संकल्पना प्रत्यक्षात आणून महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य रेशीम आणि ग्रामीण वस्त्रोद्योग राज्य बनविण्याचा शासनाचा संकल्प आहे, असे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले.

गावातच उभारणार रेशीम उद्योगाची संपूर्ण साखळी

 गावातच उभारणार रेशीम उद्योगाची संपूर्ण साखळी

महाराष्ट्रातील तुती आणि टसर रेशीम शेतीचा क्लस्टर आधारित, एकात्मिक आणि शाश्वत विकास करण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी गावपातळीवर सॉईल टू सिल्क’  ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. तुती लागवडीपासून रेशीम कीटकांचे संगोपन, कोष उत्पादन, रेशीम धागानिर्मिती, रंगकाम, वस्त्रनिर्मिती आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया गावातच विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. यामुळे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यासोबतच गुणवत्तेत सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेशी थेट जोडणे शक्य होईल.

 

 

गडचिरोलीतील टसर रेशीम उद्योगाला प्रोत्साहन

 गडचिरोलीतील टसर रेशीम उद्योगाला प्रोत्साहन

गडचिरोली जिल्ह्यातील टसर रेशीम उद्योगालाही शासनाकडून विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि वननिवासी बांधवांना आत्मनिर्भरतेची दिशा देणे, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन आणि बाईफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन यांच्यात जुलै २०२६ मध्ये संयुक्त प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

 

कोषापासून वस्त्रनिर्मितीपर्यंतची मूल्यसाखळी

 कोषापासून वस्त्रनिर्मितीपर्यंतची मूल्यसाखळी

बारामती येथे महाराष्ट्रातील पहिले कोशोत्तर प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकरी आणि नवउद्योजकांना रेशीम कोषापासून रेशीम धागा, वस्त्र आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे केवळ रेशीम कोषाचे उत्पादन आणि विक्री न करता कोषापासून मुलायम रेशीम वस्त्रापर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी महाराष्ट्रातच विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे मंत्री सावकारे यांनी सांगितले.

रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार

 रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार

-वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

·         शेतकरी, महिला व युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर

 

मुंबई, दि. १ : महाराष्ट्रात रेशीम शेती व रेशीम उद्योगाच्या विकासाला मोठा वाव असून, शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत शाश्वत आणि चांगले उत्पन्न मिळवून देणारा पर्याय म्हणून रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सॉईल टू सिल्क  आत्मनिर्भर रेशीम ग्रामया संकल्पनेच्या माध्यमातून रेशीम शेतीची लागवड ते मूल्यवर्धित उत्पादन आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.

 

वस्त्रोद्योग मंत्री म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना रेशीम कोषाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी विविध ठिकाणी कोष खरेदी-विक्री बाजारपेठा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. बीड, जालना आणि बारामती येथे कोष बाजारपेठा सुरू असून, सोलापूर आणि जालना येथेही नव्याने कोष बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ मिळण्यास मदत होत आहे.

 

राज्यात सध्या २७ जिल्ह्यांमध्ये रेशीम कार्यालये कार्यरत असून, जळगाव येथे नव्याने जिल्हा रेशीम कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून रेशीम विभागाच्या विविध योजना, आधुनिक तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.

Featured post

Lakshvedhi