रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार
-वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
· शेतकरी, महिला व युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर
मुंबई, दि. १ : महाराष्ट्रात रेशीम शेती व रेशीम उद्योगाच्या विकासाला मोठा वाव असून, शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत शाश्वत आणि चांगले उत्पन्न मिळवून देणारा पर्याय म्हणून रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सॉईल टू सिल्क आत्मनिर्भर रेशीम ग्राम’ या संकल्पनेच्या माध्यमातून रेशीम शेतीची लागवड ते मूल्यवर्धित उत्पादन आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.
वस्त्रोद्योग मंत्री म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना रेशीम कोषाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी विविध ठिकाणी कोष खरेदी-विक्री बाजारपेठा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. बीड, जालना आणि बारामती येथे कोष बाजारपेठा सुरू असून, सोलापूर आणि जालना येथेही नव्याने कोष बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ मिळण्यास मदत होत आहे.
राज्यात सध्या २७ जिल्ह्यांमध्ये रेशीम कार्यालये कार्यरत असून, जळगाव येथे नव्याने जिल्हा रेशीम कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून रेशीम विभागाच्या विविध योजना, आधुनिक तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment