Wednesday, 2 September 2026

अमृताहुनी गोड’मधून ज्येष्ठ संगीत मान्यवरांचा सन्मान आणि स्वरसोहळा ७ सप्टेंबर रोजी विलेपार्ले येथे अमृत महोत्सवी संगीत कलाकारांच्या गौरवाचा विशेष कार्यक्रम

 अमृताहुनी गोडमधून ज्येष्ठ संगीत मान्यवरांचा सन्मान आणि स्वरसोहळा

७ सप्टेंबर रोजी विलेपार्ले येथे अमृत महोत्सवी संगीत कलाकारांच्या गौरवाचा विशेष कार्यक्रम

 

            मुंबई, दि. २  : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने सन २०२५-२६ मध्ये आपल्या वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या अथवा ७५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांचा सन्मान तसेच त्यांनी गायलेल्या, स्वरबद्ध केलेल्या आणि संगीत संयोजन केलेल्या गीतांचा व नृत्याचा विशेष स्वरसोहळा अमृताहुनी गोडहा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

            सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे हा विशेष कार्यक्रम होणार आहे. संगीत क्षेत्रातील प्रदीर्घ आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करणे, त्यांच्या कलाकृतींचे स्मरण करणे आणि त्यांच्या सांगीतिक योगदानाचा नव्या पिढीशी परिचय करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

            या कार्यक्रमात श्रीधर फडके, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, भीमराव पांचाळे, अजित कडकडे, डॉ. मंजिरी देव आणि अप्पा वढावकर यांचा सन्मानार्थी व विशेष सहभागी म्हणून सहभाग असणार आहे. त्यांच्या कलाप्रवासाला उजाळा देत त्यांच्या गायन, स्वररचना आणि संगीताशी संबंधित निवडक कलाकृतींचे सादरीकरण या स्वरसोहळ्यात करण्यात येणार आहे.

            कार्यक्रमात मंदार आपटे, सोनाली कर्णिक, धनश्री देशपांडे, शार्दुल कवठेकर, प्राजक्ता सातर्डेकर आणि ओंकार प्रभूघाटे हे गायक कलाकार सादरीकरण करणार आहेत. विघ्नेश जोशी निवेदन करणार असून, सागर साठे संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. तसेच डॉ. मंजिरी देव यांच्या शिष्यांचे नृत्य सादरीकरण हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण असणार आहे.

            हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ व ज्येष्ठतम कलावंतांच्या योगदानाचा गौरव करणे, त्यांच्या कलासाधनेचा वारसा जतन करणे आणि तो रसिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

            या कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. शिल्लक प्रवेशिका रविवार, ६ सप्टेंबर २०२६ पासून नाट्यगृहावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. कार्यक्रमातील काही रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्येष्ठ संगीत मान्यवरांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या सांगीतिक योगदानाला समर्पित अमृताहुनी गोडया विशेष स्वरसोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक  प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला सर्वोच्च प्राधान्य

 शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला सर्वोच्च प्राधान्य

रेशीम कोषाचे उत्पादन वाढविणे हा एकमेव उद्देश नसून रेशीम शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे, असे मंत्री सावकारे यांनी स्पष्ट केले. कोषपूर्व, कोशोत्तर आणि मूल्यवर्धनाचे सर्व टप्पे एकत्रितपणे विकसित झाल्यास प्रत्येक टप्प्यावर रोजगार आणि उत्पन्नाच्या नव्या संधी निर्माण होतील. यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, बँका, रेशीम विभाग तसेच संबंधित शासकीय विभाग यांचा समन्वय साधण्यात येणार आहे. योजनांचा लाभ प्रत्येक रेशीम शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासोबतच महिला आणि युवकांसाठी गावातच वर्षभर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

 

गावातच रोजगाराच्या संधी निर्माण झाल्यास ग्रामीण युवकांचे शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत होईल. प्रगत रेशीम गावांना रोल मॉडेल रेशीम ग्रामम्हणून विकसित करून त्यांची यशोगाथा राज्यातील इतर गावांपर्यंत पोहोचविण्यात येईल. यातून महाराष्ट्रात रेशीम शेतीची नवी चळवळ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

 

रेशीम धागा हा केवळ वस्त्रनिर्मितीचा धागा नाही; तो शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामीण उद्योजकांच्या आर्थिक परिवर्तनाचा धागा आहे. याच धाग्याला विकासाचा धागा बनवत महाराष्ट्रात सॉईल टू सिल्क  – आत्मनिर्भर रेशीम ग्रामही संकल्पना प्रत्यक्षात आणून महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य रेशीम आणि ग्रामीण वस्त्रोद्योग राज्य बनविण्याचा शासनाचा संकल्प आहे, असे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले.

गावातच उभारणार रेशीम उद्योगाची संपूर्ण साखळी

 गावातच उभारणार रेशीम उद्योगाची संपूर्ण साखळी

महाराष्ट्रातील तुती आणि टसर रेशीम शेतीचा क्लस्टर आधारित, एकात्मिक आणि शाश्वत विकास करण्यावर शासनाचा भर आहे. यासाठी गावपातळीवर सॉईल टू सिल्क’  ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. तुती लागवडीपासून रेशीम कीटकांचे संगोपन, कोष उत्पादन, रेशीम धागानिर्मिती, रंगकाम, वस्त्रनिर्मिती आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया गावातच विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. यामुळे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यासोबतच गुणवत्तेत सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेशी थेट जोडणे शक्य होईल.

 

 

गडचिरोलीतील टसर रेशीम उद्योगाला प्रोत्साहन

 गडचिरोलीतील टसर रेशीम उद्योगाला प्रोत्साहन

गडचिरोली जिल्ह्यातील टसर रेशीम उद्योगालाही शासनाकडून विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात रोजगाराच्या संधी निर्माण करणे, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करणे आणि वननिवासी बांधवांना आत्मनिर्भरतेची दिशा देणे, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासन आणि बाईफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन यांच्यात जुलै २०२६ मध्ये संयुक्त प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

 

कोषापासून वस्त्रनिर्मितीपर्यंतची मूल्यसाखळी

 कोषापासून वस्त्रनिर्मितीपर्यंतची मूल्यसाखळी

बारामती येथे महाराष्ट्रातील पहिले कोशोत्तर प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकरी आणि नवउद्योजकांना रेशीम कोषापासून रेशीम धागा, वस्त्र आणि इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे केवळ रेशीम कोषाचे उत्पादन आणि विक्री न करता कोषापासून मुलायम रेशीम वस्त्रापर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी महाराष्ट्रातच विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे मंत्री सावकारे यांनी सांगितले.

रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार

 रेशीम शेतीची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारणार

-वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

·         शेतकरी, महिला व युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर

 

मुंबई, दि. १ : महाराष्ट्रात रेशीम शेती व रेशीम उद्योगाच्या विकासाला मोठा वाव असून, शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीसोबत शाश्वत आणि चांगले उत्पन्न मिळवून देणारा पर्याय म्हणून रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. सॉईल टू सिल्क  आत्मनिर्भर रेशीम ग्रामया संकल्पनेच्या माध्यमातून रेशीम शेतीची लागवड ते मूल्यवर्धित उत्पादन आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी गावपातळीवर उभारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.

 

वस्त्रोद्योग मंत्री म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना रेशीम कोषाला योग्य बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी विविध ठिकाणी कोष खरेदी-विक्री बाजारपेठा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. बीड, जालना आणि बारामती येथे कोष बाजारपेठा सुरू असून, सोलापूर आणि जालना येथेही नव्याने कोष बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य बाजारपेठ मिळण्यास मदत होत आहे.

 

राज्यात सध्या २७ जिल्ह्यांमध्ये रेशीम कार्यालये कार्यरत असून, जळगाव येथे नव्याने जिल्हा रेशीम कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून रेशीम विभागाच्या विविध योजना, आधुनिक तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.

कागल येथील ‘शाहू सृष्टी’ जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा

 कागल येथील ‘शाहू सृष्टी’ जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करा

                                                            - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

 

मुंबई, दि. १ : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव त्यांचे कार्य, विचार आणि सामाजिक सुधारणांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कागल येथे जागतिक दर्जाची ‘शाहू सृष्टी’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ‘शाहू सृष्टी’ केवळ संग्रहालय न राहता इतिहास, संस्कृती, शिक्षण, पर्यटन आणि निसर्ग यांची सुंदर सांगड घालणारे जागतिक दर्जाचे आकर्षक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.

 

मंत्री मुश्रीफ यांच्या दालनात या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. कागल नगरपालिका आणि राज्य शासनाच्या निधीतून साकारण्यात येणारा हा प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पासाठी नगरपालिकेची सुमारे २० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. याबाबत थ्रीडी आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, कागलचे उपनगराध्यक्ष जयवंत रावण, मुख्याधिकारी अजय पाटणकर, शाहू कारखाना संचालक युवराज पाटील, विक्रमसिंह घाटगे बँकेचे संचालक एम. पी. पाटील, पाणी पुरवठा सभापती प्रकाश गाडेकर, आनंदा पसारे, गजानन माने, शिवाजी मोरे, भिकाजी देवकर, विकास पाटील आदी उपस्थित होते. 

 

हा प्रकल्प मंत्री हसन मुश्रीफ आणि राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून उभा राहणार आहे. प्रस्तावित सुविधा आणि विकास आराखड्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रस्तावित ‘शाहू सृष्टी’मध्ये शाहू महाराजांच्या जीवनकार्याची आणि सामाजिक विचारांची आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मांडणी करणारे जीवनकार्य आणि वारसा, तसेच पर्यटकांसाठी विविध सुविधा असलेला पर्यटक सुविधा क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. संग्रहालय, ऐतिहासिक वास्तूंच्या प्रतिकृती, डिजिटल माहिती केंद्र, प्रदर्शन दालने, अॅम्फिथिएटर, स्थानिक खाद्यपदार्थ व स्मृतिचिन्हांची दुकाने, साहसी उपक्रमांसाठी अडव्हेंचर पार्क, क्लब हाऊस, पर्यटन निवासाची सुविधाही प्रस्तावित आहे.

 

शाहू महाराजांचे शिक्षण, सामाजिक न्याय, आरोग्य, कला, क्रीडा, उद्योग आणि लोककल्याण यातील योगदान तसेच त्यांचे दूरदृष्टीपूर्ण विचार आधुनिक आणि अनुभवाधारित पद्धतीने पर्यटक व विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात येणार आहेत. त्यासाठी संशोधन, अध्ययन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी स्वतंत्र प्रशासकीय व शैक्षणिक केंद्राचीही संकल्पना मांडण्यात आली आहे.

 

शाहू सृष्टी’च्या विकासाला व्यापक स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्यासमोरही प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कागलच्या पर्यटन विकासाला चालना मिळण्याबरोबरच राजर्षी शाहू महाराजांचा समतावादी आणि पुरोगामी विचार देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. सादरीकरण शाहू सृष्टीचे आर्किटेक्ट आदित्य बेगमपुरे यांनी केले.

Featured post

Lakshvedhi