ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक शिक्षण पोहोचविण्यास
शासन प्रयत्नशील
-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
- ‘एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क’च्या दोन दिवसीय उपक्रमाचे उद्घाटन
मुंबई, दि. ३ : डिजिटलायझेशनच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर वाढत आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शहरी भागासह ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत जागतिक दर्जाचे आधुनिक शिक्षण पोहोचविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या समान संधी मिळण्यासाठी जागतिक स्तरावरील अभ्यासक्रम भारतीय भाषांमध्ये अनुवादित करून सोप्या स्वरूपात उपलब्ध करण्याबाबत विचार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
गोरेगांव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात ‘एज्युकेशन ग्रोथ नेटवर्क’च्या दोन दिवसीय ‘एज्युकेशन कनेक्ट एक्स्पो’चे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी एज्युकेशन ग्रोथ च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉली सिंग उपस्थित होत्या.
शिक्षण क्षेत्रातील नव्या संकल्पना, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शैक्षणिक विकासाच्या विविध पैलूंवर या उपक्रमात विचारमंथन होत आहे. या चर्चासत्रातून पुढे येणाऱ्या सूचना आणि निष्कर्षांचा राज्याच्या प्रस्तावित बालधोरणात समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.
No comments:
Post a Comment